'शहाळे' आणि ऑनलाइन डिलिव्हरीचे मायाजाल!

पूर्वीच्या काळी शहाळे पिणे म्हणजे अत्यंत साधी आणि खिशाला परवडणारी गोष्ट होती. एकतर स्वतःच्या भाटात जाणे व झाडावरून ताजे शहाळे मिळवणे किंवा एखाद्या कोपऱ्यावरच्या गाड्यावर जाणे, शहाळे निवडणे, 'पाणी जास्त असणारे शहाळे द्या' असे सांगून २५-३० रुपयांत शहाळे फस्त करणे, इतकीच काय ती साधी प्रक्रिया असायची. पण आता काळ बदललाय. आता सर्व काही तुमच्या बोटांच्या टोकावर आहे! मात्र, या सोयीच्या नावाखाली तुमची 'आर्थिक लूट' कशी होते, याचा विचार कधी केला आहे का? समजा, एखादे ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप शहाळे विकायला लागले, तर नेमके काय होईल?

Story: मिश्किली |
22nd August, 11:29 pm
'शहाळे' आणि ऑनलाइन डिलिव्हरीचे मायाजाल!

आॅर्डरची सुरुवात: ५० रुपयांचे शहाळे आणि बिलाचा महापूर!

तुम्ही अॅप उघडता, शहाळे शोधता आणि ते तुम्हाला अगदी '५० रुपये' असे दिसते. तुम्ही खुश होता! पण बिल पेमेंटच्या पानावर जाताच तुम्हाला धक्का बसतो. ते ५० रुपये म्हणजे फक्त शहाळ्याची मूळ किंमत असते; खरी करामत तर त्यानंतर सुरू होते. पहिले येते 'ट्री क्लायंबिंग चार्ज' (२५ रुपये), कारण तुमच्या शहाळ्यासाठी कोणीतरी माडावर चढलेला असतो. त्यानंतर 'गेटिंग डाऊन चार्ज' (३० रुपये) - विचार करा, झाडावर चढणे एकवेळ सोपे असेल, पण जड शहाळे घेऊन खाली उतरणे किती जोखीमयुक्त आहे! पुढे 'चॉपिंग चार्ज' (२० रुपये). शहाळे चिरण्यासाठी स्वतंत्र कारागीर लागतो, ज्याचे कौशल्य फुकट नसते. मग येतो 'इको-फ्रेंडली स्ट्रॉ' (५ रुपये), कारण प्लास्टिक वापरायचे नाही म्हणून हा पर्यावरण ‘प्रेमाचा’ एक्स्ट्रा चार्ज! त्यानंतर 'मलाई काढण्याचे चार्ज' (१० रुपये) आणि शहाळ्यानंतर उरलेल्या कचऱ्यासाठी 'वेस्ट डिस्पोजल चार्ज' (२० रुपये) आकारणे अॅपच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. या सगळ्यावर पुन्हा 'जीएसटी' (५५.१६ रुपये) लावला, की बिलाचा आकडा थेट १८० रुपयांच्या पुढे निघून जातो. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे!

ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्सची खरी मजा त्यांच्या अफाट शुल्कांमध्ये असते. समजा, बाहेर पाऊस पडत असेल, तर तुमच्या खिशाला अजूनच मोठी कात्री लागते. 'रेन फी' म्हणून ३० रुपये आकारले जातात आणि सोबतच 'हँडलिंग चार्ज' म्हणून ३५ रुपये लावले जातात. तुम्ही विचार करता, "अरे, ३५ रुपये हँडलिंग आणि ३० रुपये रेन फी? पुढे मग डिस्काऊंट सुद्धा असते व तो रंग हिरवा करून दाखवला जातो. ३५ मधून ३० वजा केले तर ५ रुपये वाचले आणि ‘डिलिव्हरी फ्री’ हे ही लिहिलेले असते. हा उच्च दर्जाचा गणिती विचार करणारे तुम्ही खरोखर महान आहात, पण अॅप्स तुमच्या बुद्धिमत्तेच्या कैकपटीने पुढे जाऊन काम करतात!

या सगळ्याच्या वर येते 'प्लॅटफॉर्म फी' (२१ रुपये). अॅप चालवण्यासाठी तुम्ही खारीच्या वाट्याइतका हातभार लावलाच पाहिजे ना? आणि हो, तुमच्या प्रत्येक ऑर्डरवर 'पाडेली इन्शुरन्स' हा नवीन कर जोडला जाणार; बिचाऱ्या पाडेलीला काही झाले, तर त्याची भरपाई कोण करणार? पावसाळ्यात तर अॅपवर भन्नाट नोट येणार: Your पाडेली might get down slowly due to rain. कारण तो घसरून पडला तर मग इन्शुरन्स तेव्हाच वापरावे लागणार. हे सगळे वाचून तुम्हाला हसावे की रडावे तेच कळत नाही. काही वेळाने पुढची नोटिफिकेशन झळकते. “पाडेली is reaching your doorsteps and will soon deliver your coconuts.” एकंदरीत सांगायचे झाले तर तुम्हाला शहाळे ताजे आणि फ्रेश मिळावे म्हणून पाडेली स्वतःच झाडावर चढून नारळ काढतो आणि ट्रॅफिकमध्ये अडकत, भिजत तुमच्या दारापर्यंत पोहोचवतो. शेवटी, जेव्हा तो भिजलेला पाडेली तुमच्या दारात उभा ठाकतो, तेव्हा तुमची अंतःकरणरूपी माणुसकी जागी होते आणि तुम्ही अॅपवरील पर्यायानुसार त्याला 'टिप' देता – थेट '२० रुपये'!

थोडक्यात सांगायचे तर, शहाळे पिणे हा आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे, पण ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून तो आता आर्थिक विवंचनेचा मुख्य पर्याय बनला आहे. तुम्ही जर हेच ५० रुपयांचे शहाळे कोपऱ्यावरच्या गाड्यावरून घेतले असते, तर तुमचे सहज १३० ते १५० रुपये वाचले असते. पण प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न घरबसल्या सुख विकत घेण्याचा आहे; आणि या सुखाची किंमत आपल्याला जीएसटी, हँडलिंग चार्ज आणि रेन फीच्या रूपात मोजावीच लागते.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अशी एखादी साधी गोष्ट ऑनलाइन मागवाल, तेव्हा एकदा बिलातील रकान्यांकडे डोळे उघडून नक्की पहा. कदाचित तिथे तुम्हाला 'श्वास घेतल्याचे शुल्क' किंवा 'पाडेलीने तुमच्याकडे पाहून गोड हसल्याचे शुल्क' असे काही नवेकोरे चार्जीस सुद्धा दिसायला लागतील! तोपर्यंत, खिडकीत बसून पाडेलीची वाट पाहत राहा आणि सोन्याच्या भावात पडलेल्या त्या शहाळ्याचा मनसोक्त आनंद घ्या!


- आदित्य सिनाय भांगी, पणजी