'डब्ल्यूएचओ'च्या अहवालानुसार, जगभरात एक अब्ज लोक मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत. सहजासहजी लक्षात न येणारे शेकडो ‘सायको’ आपल्या अवतीभवती फिरत असतील. आपल्या शेजारी, कामाच्या ठिकाणी, अन्य ठिकाणी अशा वृत्तीचे लोक दिसून आले, तर नेमके काय करावे, याचे कसलेही ठोकताळे नाहीत. सार्वजनिक जीवनात अशा लोकांपासून मोठा धोका असतो. यासाठीच मानसिक आराेग्याच्या क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी समाजमन सुन्न केले. यातील दोन घटना महाराष्ट्रात, तर एक गोव्यात घडली. पहिल्या घटनेत वाग्दत्त वधूनेच प्रियकराच्या सहाय्याने पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून आपल्या भावी पतीचा जीव घेतला. दुसरीकडे, मुंबईत लोकल रेल्वेचे दार लावण्यावरून झालेल्या वादातून एकाने सुऱ्याने भोसकून युवकाचा जीव घेतला, तर गोव्यात कोलवाळ येथे मद्यधुंद युवकांना जाब विचारणाऱ्या वृद्धाचा मारहाणीत जीव घेतला गेला. या तीनही घटना दिसायला वेगवेगळ्या असल्या, तरी त्यातील एक गंभीर समान धागा म्हणजे, यात आरोपी असलेल्यांची मानसिकता. जसजसा या प्रकरणांचा तपास पुढे पुढे सरकत राहील, तसतसे यातील अनेक कंगोरे उलगडत जातील. मात्र यात सहभाग असलेले ही कृती करण्यास कसे काय धजावले याचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे.
आजच्या घडीला समाजमन इतके उथळ आणि एकांगी बनले आहे की, आपल्या विचारधारेच्या अथवा कृतीच्या विरोधी सूर मुळीच सहन केला जात नाही. थेट एकेरीवर येऊन टोकाचा विरोध करण्याची वृत्ती बळावत चालली आहे. कुठल्या गोष्टीवरून कधी कोण हिंसक बनून टोकाचे पाऊल उचलेल, याची शाश्वती राहिलेली नाही. साध्या साध्या गोष्टींवरून वादंग, हाणामाऱ्या आणि चक्क खून करण्यापर्यंत मजल मारली जाते. समाजाला शिस्त लावण्याच्या नादात एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते, हे कोलवाळ येथील घटनेतून दिसून आले. ज्या वृद्धाला मारहाण झाली, त्याच्यासोबत संशयितांपैकी दोघांचे पूर्ववैमनस्य होते, अशी माहिती समोर आली आहे. त्या रागातूनच हा मारहाणीचा प्रकार घडला. दारू पिऊन दंगामस्ती करणाऱ्या युवकांना या ज्येष्ठ नागरिकाने हटकले. मात्र डोक्यात राग आणि दारूची नशा चढलेल्या चार तरुणांनी त्या ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या वृद्धाला सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांनाही त्या तरुणांनी हाणामारी केली. त्यात एकाचा हात फ्रॅक्चर झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा नंतर मृत्यू झाला. सध्या सर्व चारही संशयित पोलीस कोठडीत आहेत. कदाचित नंतर त्यांना सशर्त वगैरे जामीन मिळून ते मोकळे सुटतीलही. वर्षानुवर्षे खटला चालेल. त्यातूनही ते पुराव्याअभावी किंवा कोणत्या तरी कारणाखाली निर्दोष सुटतील. किंवा कदाचित कायद्याच्या फासात अडकून दीर्घ मुदतीची शिक्षा भोगतील. यापैकी काहीही घडू शकते. पोलीस आपले काम करतील, न्यायालयीन यंत्रणा आपल्या मापदंडांप्रमाणे निवाडा करतील. पण ज्या मानसिक अवस्थेतून हा गुन्हा घडला, तिचे काय? या मानसिक कोंडीला भेदण्याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? एखाद्या विषयावरून किरकोळ वाद झाला, तर मारहाण करून जीव घेण्यापर्यंत मजल का जाते, याचा शोध घ्यायला हवा. अशा सुप्त गुन्हेगारीची बीजे नेमकी कशी पोसली जातात, याचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार व्हायला हवा. भविष्यकाळात अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थीदशेतील पिढीला समुपदेशनाचे धडे द्यायला हवे. एनईपीच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. त्यात मानसिक आरोग्याचाही समावेश व्हायला हवा. त्यातून भविष्यातील व्यसनाधीनतेलाही लगाम घालणे शक्य आहे. मानसशास्त्र, मानसोपचार क्षेत्रातील अनुभवी लोक आणि संस्थांची मदत घेऊन हे उपक्रम राबविण्याची गरज आहे. सतत नकारात्मक विचार करणाऱ्यांना मानसिक व्याधी जडतात व ते हळूहळू मानसिक कोंडीचे गुलाम बनतात. कालांतराने इतरांशी फटकून वागणे, लहानसहान गोष्टींवरून त्रागा, चिडचिड करणे, ठराविक व्यक्तींविषयी आकस बाळगून नेहमी वादंग करणे, शाब्दिक वादातून हातघाईवर येणे ही प्राथमिक स्थितीतील लक्षणे असतात. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात स्थिती आणखी चिघळते. अशाच मनोवस्थेतून टाेकाचे निर्णय घेतले जातात. रागाचा पारा चढल्याने एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल मारली जाते. त्यामुळे विद्यार्थी दशेतच मनाचे आरोग्य हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पुण्यातील केतन अग्रवाल याच्या हत्येचा प्रकार तर मानसिक अवस्थेचा हळवा कोपरा उलगडणारा ठरला. केतनची होणार पत्नी सिया गोयल हिने प्रियकराच्या मदतीने केतनला लोहगडावरून ढकलून दिले. वर कांगावा केला की, तो पाय घसरून खाली पडला. सुरुवातीला यावर सर्वांनीच विश्वास ठेवला. मात्र केतनच्या वडिलांना आणि पोलिसांना काही तरी खटकत होते. त्यातूनच बारकाईने तपास केला असता, सियाने प्रियकरासमवेत मिळून केलेला हा नियोजनबद्ध खून असल्याचे निदर्शनास आले. हा खून नेमका का केला, याची कारणे आता समोर आली आहेत. केतन तोतरा बाेलतो आणि टक्कल असल्यामुळे वीग वापरतो, या कारणावरून त्याच्याशी लग्न करायचे नव्हते, म्हणून त्याला मारून टाकले, अशी कबुली सियाने दिली आहे. ही कारणे कोणालाही हास्यास्पद वाटतील. मात्र आजची वस्तुस्थिती पाहता, हे खरे असू शकते. सोशल मीडियाचा एकूणच अतिरेक आणि क्राईम-थ्रिलर चित्रपट, वेबसीरीजचा रतीब पहाता, अशा प्रकारांना ऊत आल्यास नवल नाही. अशाच मानसिक कोंडीतून टोकाची भूमिका घेण्याचा प्रकार मुंबईतील लोकल रेल्वेत घडला. रेल्वेचे दार बंद करण्यावरून झालेल्या बाचाबाची आणि हातघाईनंतर एकाने लोकलमध्येच सुऱ्याने भोसकून युवकाचा जीव घेतला. या प्रकारानंतर सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र अशा मनोवस्थेचे काय करायचे, यावर फारसे काेणी बोलताना दिसत नाही. या समस्येवर लक्ष केंद्रित करायला हवे.
मानसिक आरोग्य महत्त्वाचे
शेकडो ‘सायको’ आपल्या अवतीभवती फिरत असतील. आपल्या लक्षात येऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू, तर ती मोठी चूक ठरू शकते. आपल्या शेजारी, कामाच्या ठिकाणी, अन्य ठिकाणी अशा वृत्तीचे लोक दिसून आले, तर नेमके काय करावे, याचे कसलेही ठोकताळे उपलब्ध नाहीत. संभाव्य इजा होण्यापासून वाचण्यासाठी अशा लोकांपासून अंतर राखणे हा तात्कालिक उपाय ठरतो. पण ज्याला त्याचा स्वभाव माहीत नाही, अशांच्या सुरक्षिततेचे काय? यासाठीच मानसिक आराेग्याच्या क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. स्वीडन, नॉर्वे, नेदरलॅंड, यूके अशा काही देशांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या देशांत शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमातही या विषयाचा अंतर्भाव केला आहे. अशा उपयुक्त उपक्रमांचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात तब्बल १०० कोटी लोक मानसिक आजारांनी ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, नैराश्य, आर्थिक विवंचना, कौटुंबिक समस्या अशा अनेक कारणांमुळे मनोरुग्ण वाढत आहेत. ताज्या अहवालानुसार आनंदी जीवनशैली निर्देशांकात (हॅपिनेस इंडेक्स) १४७ देशांत भारत ११६व्या क्रमांकावर आहे. ही चिंतेची बाब आहे. मानसिक आरोग्याचा थेट संबंध आनंदी जीवनशैलीशी असतो, हे लक्षात घ्यायला हवे!
गोवेकरांना 'टेली मानस'चा आधार
गोवा आरोग्य संचालनालयाच्या ‘टेली मानस हेल्पलाईन’ सेवेने यात चांगली भूमिका बजावली आहे. या हेल्पलाईनवर दिवसाकाठी सरासरी ५० ते ६० कॉल्स येत असतात. मे २०२३ पासून गेल्या ३ वर्षांत ३२ हजारांपेक्षा जास्त कॉल्स आले आहेत. मानसिक ताणतणाव, कौटुंबिक समस्या, अभ्यासाचा ताण तसेच नैराश्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या मानसिक त्रासातून काही जण टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करतात. अशा सर्व व्यक्तींना मानसिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला देण्यासाठी गोवा सरकारने ही मोफत सेवा सुरू केली आहे. ही सेवा उत्तम कार्य करत असली, तरी तिचा प्रभाव थेट मदत मागणाऱ्यांपुरता मर्यादित आहे. जे लोक या सेवेपासून वंचित आहेत, ज्यांना या हेल्पलाईनबाबत माहिती नाही त्यांचे काय? त्यांच्यासाठीही काही तरी ठोस करण्याची गरज आहे. अशा मनोवृत्तीचे अनेक जण अवतीभवती असतात. त्यांच्या संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वर्तनाची माहिती घेऊन त्यांना वेळीच योग्य समुपदेशन किंवा मानसोपचार मिळायला हवेत. तशी यंत्रणा आरोग्य क्षेत्रात निर्माण करणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींविषयी तक्रार करण्याची आणि त्याचे निराकरण करण्याची यंत्रणा उभारायला हवी.
मानसिक कोंडीतून सुटका कोणाला नको असते? ती करण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. अशा लोकांबाबत माहिती घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सरकार पातळीवर आणखी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. यातून कोणाचे तरी जीवनमान स्थिरस्थावर होईल, कोणाला तरी आशेचा नवा किरण गवसेल, कोणाचा तरी जीव हकनाक जाण्यापासून रोखता येईल. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही संतुलित असणे आवश्यक आहे.
- सचिन खुटवळकर, (लेखक गोवन वार्ताचे वृत्त संपादक आहेत.)