सासूच्या टोमण्यांमुळे मन मारून जगणाऱ्या नीलांबरीला भावाच्या मुलाच्या बारशाचे आमंत्रण येते. मात्र, माहेरी जाण्यापूर्वी तिच्या सासूबाई तिच्यासमोर एक अशी अट ठेवतात, ज्याने ती थक्कच होते.

नीलांबरी भराभर स्वयंपाकखोलीतली कामं हातावेगळी करीत होती. घासलेली भांडी नीट पुसून जाग्यावर लावत होती. ओट्यावर एखादा खरकटा कण तर चुकून राहिला नाही ना, यावर काळजीपूर्वक नजर ठेवत चालली होती. प्रत्येक बाबतीत निमित्त करून काहीतरी बोलायची संधी तिच्या सासूबाई अजिबात सोडत नव्हत्या. मूकपणे शब्दांचा मार झेलत राहणं हेच तिला अनुभवावं लागत होतं.
तिनं एकदा हळुवार पावलांनी थोडंसं पुढे सरकत बाहेर वळून पाहिलं. सासूबाई कोणाशी तरी बोलत बसल्या होत्या. ती पुन्हा हलक्या पावलांनी स्वयंपाकखोलीत परतली.
"नीला, ए नीला.. थोडा चहा आण ग करून..! संध्याताई आल्यात." सासूबाईंचा आवाज ऐकून तिनं न बोलता गॅसवर चहाचं आधण ठेवीत घड्याळावर नजर टाकली. दुपारचे अडीच वाजत आले होते. तिनं एक उसासा टाकला.
"आमची सुनबाई म्हणजे काही कामाची नाही अगदी..! काय बोलणार.. नशीब एकेकाचं.. दुसरं काय!" निर्मलाबाई संध्याताईंशी बोलत चालल्या होत्या.
नीलाला सारं काही आतून नीट ऐकू येत होतं.
"आई, चहा.." नीला कप पुढे करीत म्हणाली.
"मला काय देतेयस, त्यांना दे.." निर्मलाबाईंनी आवाज चढवत म्हटले.
संध्याताईंच्या हातात चहाचा कप देत ती आत जायला वळली. काहीतरी आठवल्यागत झाल्याने ती पुन्हा माघारी फिरली.
"आई, तुमच्याशी बोलायचं होतं थोडं.. तुम्हाला वेळ असला की सांगा हा.." ती उद्गारली.
"काय ते इथेच सांग. संध्याताई काही परक्या नाहीत मला!" निर्मलाबाई कडाडल्या.
"आज बारशाचा कार्यक्रम आहे ना माहेरी.. त्यासाठी जाणार होते." नीला त्यांच्याकडे पाहत म्हणाली.
"जाणार म्हणतेयस? खुशाल जा. आपल्या घरात अजून चार वर्ष झाली तरी पाळणा हलला नाही आणि निघालीय दुसऱ्यांची बारशी करायला." निर्मलाबाई नीलांबरीकडे पाहत उपहासाने म्हणाल्या. नीलांबरीचे डोळे भरून आले.
"माझ्या भावाच्या मुलाचं बारसं आहे म्हणून जाणार होते." नीलांबरी कचरत उद्गारली. संध्याताई दोघींचं बोलणं ऐकत होत्या.
"जाणार तर जा, माझं काही एक म्हणणं नाहीये. तुझा भाऊ.. नि वहिनी.. मी काय बोलणार, नाही का..!" संध्याताईकडे पाहत निर्मलाबाई म्हणाल्या.
"पण हो, जाताना हे अंगावरचे सारे दागिने काढून ठेवून जा इथेच.." निर्मलाबाई स्पष्टपणे बोलत होत्या. नीलांबरी पाहतच राहिली.
"अशी बघतेयस काय माझ्या तोंडाकडे..? मी काय म्हणतेय.. ऐकायला येतंय ना तुला..? काढ ते दागिने इथेच, नि दे माझ्याकडे..!" त्या चिडत म्हणाल्या.
नीला न बोलता एक एक दागिना उतरवू लागली. सारे दागिने काढीत तिनं निर्मलाबाईंच्या स्वाधीन केले. त्यांनी ते पदरात बांधून ठेवले.
"आणि हो... मंगळसूत्र पाच तोळ्यांचं आहे. नीट सांभाळून परत घेऊन ये... नाहीतर बारशात हुंदडत बसशील नि हरवशील, काय..! समजतंय ना.!" असं म्हणत त्यांनी डोळे वटारत परत नीलांबरीकडे पाहिलं. तिनं मानेनंच 'हो' म्हटलं.
चार वाजून गेले तशा संध्याताई जायला उठल्या. नीलांबरीही थोड्या वेळानं आपली तयारी करून जायला निघाली.
"मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना..!" निर्मलाबाई नीलाला खडसावीत विचारीत होत्या.
"हो." असं म्हणत ती दाराबाहेर पडली. तिला आताशा या साऱ्याची सवय होऊन बसली होती.
बराच वेळ होत आला. पावणेसात होत आले. बाहेर काळोखाल्यागत झालं होतं. बारशाचा कार्यक्रम आटोपून नीलांबरी आपल्या घरी परतत होती. उशीर झाल्याने ती भराभर पावलं उचलत चालली होती.
रस्त्यावरील वाहने वेगाने जा-ये करीत होती. शहरातील त्याच रस्त्यावर महोत्सवाची गडबड चालू होती. प्रत्येक ठिकाणी स्पीकर, कॅमेरा बसवले होते. लोकांची वर्दळ वाढत चालली होती. कार्यक्रम सुरू झाले होते.
ती आपल्याच नादात चालली होती. तितक्यात समोरून येणाऱ्या मोटरसायकलवाल्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचत पलायन केलं. तो अचानक काळोखात दिसेनासा झाला. ती घाबरल्यागत झाली. सासूबाईंचा चेहरा तिच्या समोर आला. तोंडातून आवाजच फुटेनासा झाला. क्षणभरात एकदम भानावर येत ती आकांताने ओरडू लागली... "चोर! चोर!"
पण वेगाने जा-ये करणाऱ्या वाहनांना तिचा आवाज ऐकू आला नाही. नि माणसंही महोत्सवातील कार्यक्रम पाहण्यात दंग होऊन गेली होती. जवळच्याच पटांगणात स्टेज तयार करण्यात आले होते, पण त्यांनाही तिचा आवाज ऐकू येत नव्हता.
ती भीत भीतच घरी येऊन पोहोचली. खांद्यावरून पदर घेत तिनं गळा लपवण्याचा प्रयत्न केला.
"आलीस! घड्याळात वेळ पाहिलीस का..?" तिने निर्मलाबाईंकडे पाहत हळूच घड्याळात पाहिलं. साडेआठ होत आले होते.
"जेवण कोण बनवणार..?" निर्मलाबाईंनी भुवया उंचावत चढ्या आवाजात विचारलं.
"आत्ता बनवते आई.." असं म्हणत रोजच्याप्रमाणे खांद्यावरील पदर काढून खोचीत, ती पर्स खुंटीला लावून आत जायला वळली.
"थांब. तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र कुठे आहे?" निर्मलाबाईंनी तिच्या उघड्या गळ्याकडे पाहत विचारलं.
ती थबकली. आपण गडबडीत खांद्यांवरचा पदर काढल्याचं तिच्या लक्षात आलं. चेहऱ्यावर घामाचे थेंब तयार झाले. काय बोलावं काहीच कळेनासे झाले... (क्रमश:)
- गौरी भालचंद्र