
साहित्य: बासुमती भात: १ मोठी वाटी (शिजवून घेतलेला), कांदा: २ मध्यम (बारीक चिरलेले)
गाजर: १ बारीक चिरलेले, कोबी: १ लहान वाटी (बारीक चिरलेला), सिमला मिरची: १ बारीक चिरलेली, तेल: २ चमचे, दगडफूल: २ ते ३, तमालपत्र: २, लवंग: ४ ते ५, दालचिनी: ३ ते ४ तुकडे, सोया सॉस: १ चमचा, मिरीपूड: १/२ चमचा, फ्राईड राईस मसाला: २ चमचे, मीठ: चवीनुसार
कृती : सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात दगडफूल, तमालपत्र, लवंग आणि दालचिनी घालावी व छान सुगंध येईपर्यंत ती परतून घ्यावी. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतावा. कांदा परतून झाल्यावर कढईत चिरलेले गाजर, कोबी आणि सिमला मिरची घालून या सर्व भाज्या व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घ्याव्यात. भाज्या छान शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, फ्राईड राईस मसाला, मिरीपूड आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करावेत. शेवटी आधीच शिजवून घेतलेला बासुमती भात कढईत टाकावा आणि भाताचे दाणे तुटणार नाहीत याची काळजी घेत हलक्या हाताने सर्व साहित्यात तो मिसळून घ्यावा. शेवटी कढईवर झाकण ठेवून मंद गॅसवर २ ते ३ मिनिटे छान वाफ काढून घ्यावी. तुमचा गरमागरम आणि चवदार फ्राईड राईस तयार आहे!