Home >> तरंग >> पर्यटनाचा आनंद की मृत्यूचा सापळा? गोव्यातील वाढत्या दुर्घटनांना चाप लावण्यासाठी उपाय गरजेचे

पर्यटनाचा आनंद की मृत्यूचा सापळा? गोव्यातील वाढत्या दुर्घटनांना चाप लावण्यासाठी उपाय गरजेचे

गोव्यात रस्ते अपघात आणि पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. युवा पिढीचा यात मोठा बळी जात असून, अपघातमुक्त गोव्यासाठी सरकारी उपाययोजनांसह नागरिकांनी स्वयंशिस्त व नियम पाळणे गरजेचे आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
27th June, 11:52 pm
पर्यटनाचा आनंद की मृत्यूचा सापळा? गोव्यातील वाढत्या दुर्घटनांना चाप लावण्यासाठी उपाय गरजेचे

गोव्यात समुद्रकिनारे, हिरवे डोंगर आणि निसर्गरम्य स्थळे असल्याने ते जगभर प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांत रस्ते अपघात आणि पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. मागील काही दिवसांतील घटनांची दखल घेतली असता, राज्यात दर काही तासांनी रस्ते अपघातात किंवा नद्या, समुद्र, खाणींमध्ये बुडून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय जलाशय असलेल्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी सतर्क राहून, मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्या भागातील धोकादायक स्थळांविषयी जागरूक करण्याची आवश्यकता आहे.

​याशिवाय सरकारने राज्यातील विविध भागांतील जलाशयांसंदर्भात आणि रस्ते सुरक्षेबाबत शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची अत्यंत गरज आहे.

​गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे हवामान, ओले रस्ते, अचानक येणाऱ्या लाटा आणि उत्साहाच्या भरात घेतले जाणारे धोके यामुळे दुर्घटना वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांत दूधसागर नदीपात्रात पोहायला गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. असे असतानाही काही दिवसांनंतर आणखीन दोन युवक बुडाले होते. त्यानंतर बागा बीचवर समुद्राच्या लाटांसोबत खेळताना एका पर्यटकाचा मृत्यू झाला. अशा घटना वारंवार घडू लागल्याने प्रशासनाने या घटना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्याची आवश्यकता आहे.

​राज्यातील २०२५ मधील रस्ते अपघात आणि मृत्यूच्या आकडेवारीची दखल घेतल्यास, २,३७० रस्ते अपघातांत २७३ जणांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये १८ ते ३५ वर्षे वयोगटातील १२२ युवकांचे मृत्यू झाले आहेत; ही टक्केवारी ४४.६८ एवढी आहे. तसेच २०२६ मधील मागील सहा महिन्यांची आकडेवारी पाहिल्यास त्यात काहीच फरक पडलेला नाही. हा वयोगट शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा आहे. अनेक घरातील कर्ते तरुण अपघातात गेल्याने कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू होत असल्यामुळे तो चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुखांनी आणि युवकांनी वाहतुकीचे नियम पाळणे ही काळाची गरज आहे, अन्यथा एका अपघाताने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते.

​रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. दारू पिऊन गाडी चालवणे, विनाहेल्मेट गाडी चालवणे आणि अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी तसेच वाहतूक खात्याने कडक दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सरकारी उपाययोजनांसोबतच जोपर्यंत नागरिक स्वतःहून शिस्त पाळणार नाहीत, तोपर्यंत हे अपघात रोखणे अशक्य आहे.

​त्यासाठी नागरिकांनी काही छोट्या-छोट्या नियमांचे पालन केल्यास रस्ते अपघात टाळू शकतात. नागरिकांनी सुरक्षा साधनांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय दुचाकी चालवताना नेहमी चांगल्या दर्जाचे हेल्मेट वापरावे आणि चारचाकी वाहनात सीटबेल्टचा वापर अनिवार्य करावा. तसेच राज्यातील वळणावळणाच्या आणि ओल्या रस्त्यांवर वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. मद्यपान करून वाहन चालवणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवासाठी अत्यंत घातक आहे, याची जाणीव ठेवावी. मद्यपान केल्यास किंवा पार्टी करून परतताना टॅक्सीचा वापर करावा किंवा ज्याने मद्यपान केले नाही अशा व्यक्तीला गाडी चालवण्यास द्यावी. याशिवाय इतर वाहतूक नियमांचे पालन करूनच गाडी चालवावी.

​आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांचा समावेश आहे. राज्यातील अनेक जलाशयांचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याची दखल घेऊन युवक अशा ठिकाणी पर्यटनासाठी भेट देत आहेत. अशा ठिकाणी जाताना त्यांना त्या जागांची योग्य माहिती नसते. त्यामुळे दुर्घटना घडल्यास बचावकार्य करण्यात अडचणी येतात.

​पाण्याच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनाऱ्यावर किंवा इतर ठिकाणी जीवरक्षक जेव्हा लाल झेंडा लावतात, तेव्हा समुद्र शांत नसतो. त्या वेळी पाण्यात उतरू नका. फक्त हिरवा झेंडा असतानाच आणि जीवरक्षकांच्या देखरेखीखालीच पोहा. ज्या नागरिकांना पोहता येत नसेल, त्यांनी धबधबा, नदी, विहीर किंवा पडीक खाणीच्या पाण्यात जाणे टाळावे. तसेच सेल्फीचा मोह टाळावा. पाण्याच्या काठावर, खडकावर उभे राहून रील किंवा सेल्फी काढताना अनेकांचे पाय घसरून पाण्यात पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

​गोव्यातील पर्यटनस्थळांचे सौंदर्य अनुभवणे हा आनंदाचा भाग आहे, पण त्यापेक्षा आपला जीव जास्त महत्त्वाचा आहे. अपघातमुक्त गोवा घडवण्यासाठी सरकार, पोलीस, जीवरक्षक आणि आपण सर्वांनी मिळून जबाबदारीने वागायला हवे. थोडा संयम, थोडी काळजी आणि वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनेक जीव वाचू शकतात.

- प्रसाद शेट काणकोणकर, (लेखक गोवन वार्ताचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत.)