Home >> तरंग >> गोमंतकीय युवकांसाठी सरकारी परीक्षांचे सुगीचे दिवस आणि मोफत मार्गदर्शनाची सुवर्णसंधी

गोमंतकीय युवकांसाठी सरकारी परीक्षांचे सुगीचे दिवस आणि मोफत मार्गदर्शनाची सुवर्णसंधी

येत्या मंगळवारी, दिनांक ३० जून रोजी सकाळी ठीक १० वाजता पणजी येथील 'श्रमशक्ती भवन'च्या एक्सचेंज हॉलमध्ये या विशेष सत्राचा प्रारंभ होणार आहे. हे सत्र पूर्ण दिवसभरासाठी असणार आहे.

Story: यशस्वी भव: |
27th June, 11:40 pm
गोमंतकीय युवकांसाठी सरकारी परीक्षांचे सुगीचे दिवस आणि  मोफत मार्गदर्शनाची सुवर्णसंधी

स​​​ध्या गोव्यात सरकारी नोकरीच्या परीक्षांचे सुगीचे दिवस आलेले आहेत. प्रशासकीय पातळीवर गतिमानता आणण्यासाठी आणि रिक्त जागा भरण्यासाठी अनेक सरकारी पदे मोठ्या प्रमाणावर भरली जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः डिसेंबर महिन्यापासून विविध महत्त्वाच्या सरकारी खात्यांसाठी परीक्षा घेण्याचा धडाका सुरू आहे. 'गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन', 'गोवा पब्लिक सर्विस कमिशन' (GPSC), आणि 'गोवा वीज खाते' यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रमुख सरकारी विभागांमधील विविध पदे परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून पारदर्शकपणे भरली जात आहेत. यामध्ये गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात आलेल्या 'सीबीटी - १' (Computer Based Test) आणि 'सीबीटी - २' या परीक्षांचा समावेश आहे. यासोबतच पोलीस दलातील सब-इन्स्पेक्टर पदासाठी देखील परीक्षा प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, सध्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. यामुळे गोव्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये एक मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

परंतु, या सर्व परीक्षांचा एकूण कल पाहिला असता एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सुरुवातीपासून आजपर्यंत या परीक्षांमधील प्रश्नांची काठिण्यपातळी (Difficulty Level) दिवसेंदिवस जरा वाढतच चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक परीक्षेचा असणारा वेगवेगळा पोर्शन (अभ्यासक्रम) आणि स्पर्धा होय. काही परीक्षांमध्ये इंग्रजी विषयावर जास्त भर दिला जातो, तर काही ठिकाणी प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा आदर राखत 'कोकणी' या विषयावर जास्त प्रश्न विचारले जातात. काही पदांसाठी गणिताचे प्रश्न निर्णायक ठरतात, तर काही परीक्षांमध्ये बौद्धिक चाचणी म्हणजेच 'रिझनिंग' या विषयावर अधिक प्रश्न विचारले जातात. एवढेच नव्हे तर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाचा कस पाहण्यासाठी कधी गोव्याचा समृद्ध इतिहास, तर कधी गोव्याचा भूगोल यावर देखील कठीण प्रश्न विचारले जातात. या सर्व वैविध्यामुळे आणि अभ्यासक्रमाच्या व्याप्तीमुळे प्रत्येक परीक्षेची काठिण्यपातळी बदलते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि त्यांच्या मनात परीक्षेची अनाठायी भीती निर्माण होते.

या कठीण परीक्षांचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच 'गोवा पब्लिक सर्विस कमिशन'तर्फे घेण्यात आलेली 'जेएसओ' (JSO) म्हणजेच उप-कलेक्टर पदाची परीक्षा. ही 'सीबीआरटी - १' (Computer Based Recruitment Test) परीक्षा अत्यंत अवघड पातळीची होती. या परीक्षेच्या कडक नियमांनुसार, आता काही 'बॉर्डर केसेस' म्हणजेच अंतिम गुणांच्या अगदी जवळ असलेल्या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेतली जाणार आहे, आणि त्यानंतरच मुख्य 'सीबीआरटी - २' ही पुढची परीक्षा आयोजित केली जाईल. अशा कठीण स्पर्धात्मक वातावरणात ग्रामीण भागातील किंवा आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणे कठीण होते.

गोमंतकीय विद्यार्थ्यांची हीच अडचण ओळखून 'गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज'च्या 'मॉडेल करिअर सेंटर' (पाटो-पणजी) यांच्यातर्फे एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गोवा सरकारच्या वतीने आता अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गोव्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण मोफत मार्गदर्शन देण्याची योजना आखण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवणे हे प्रत्येक गोमंतकीय तरुणाचे आणि त्याच्या कुटुंबाचे स्वप्न असते. हेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी हा अत्यंत कल्पक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने जीपीएससी (GPSC) तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांमध्ये असणारा जो 'कॉमन सिलॅबस' (समान अभ्यासक्रम) आहे, त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना गणितीय (न्यूमरिकल) आणि रिझनिंग (बौद्धिक चाचणी) हे विषय अत्यंत अवघड जातात. या अवघड प्रश्नांना परीक्षेच्या वेळेत कसे सामोरे जावे, कमीत कमी वेळेत अचूक उत्तर शोधण्यासाठी कोणत्या शॉर्टकट 'ट्रिक्स' वापराव्यात, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवणारी एक विशेष कार्यशाळा एक्सचेंजतर्फे आयोजित करण्यात आली आहे. जे विद्यार्थी अगदी नव्याने स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उतरत आहेत किंवा ज्यांनी यापूर्वी सीबीटी-१ आणि सीबीआरटी-१ दिली आहे, असे सर्व विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात.

येत्या मंगळवारी, दिनांक ३० जून रोजी सकाळी ठीक १० वाजता पणजी येथील 'श्रमशक्ती भवन'च्या एक्सचेंज हॉलमध्ये या विशेष सत्राचा प्रारंभ होणार आहे. हे सत्र पूर्ण दिवसभरासाठी असणार आहे. गोव्यातील नामांकित मार्गदर्शक या कार्यशाळेत विविध विषयांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संपूर्ण प्रशिक्षण गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत आहे. फक्त यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेवर पोहोचून आपले नाव 'रजिस्ट्रेशन' (नोंदणी) करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक गोमंतकीय तरुणाने या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ उठवायला हवा. विद्यार्थ्यांनी तातडीने गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, पाटो-पणजी या कार्यालयाशी संपर्क साधून आपली चौकशी करावी आणि या मोफत कार्यशाळेतील आपला सहभाग निश्चित करावा. योग्य वेळी मिळालेले योग्य मार्गदर्शनच यशाचा मार्ग सुकर करते, त्यामुळे या सत्राला उपस्थित राहून आपल्या सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने खंबीर पाऊल टाकावे.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)