Home >> तरंग >> संगीत रंगभूमीचे अखंड उपासक पंडित प्रसाद सावकार काळाच्या पडद्याआड

संगीत रंगभूमीचे अखंड उपासक पंडित प्रसाद सावकार काळाच्या पडद्याआड

पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांच्या निधनाने संगीत नाट्य क्षेत्रातील एक समृद्ध पर्व संपले. नव्वद वर्षे संगीत रंगभूमीची अखंड सेवा करणारे ते गोव्याचे एक महान सांस्कृतिक दैवत होते.

Story: विशेष |
20th June, 11:56 pm
संगीत रंगभूमीचे अखंड उपासक  पंडित प्रसाद सावकार  काळाच्या पडद्याआड

थोर संगीत नट आणि नाट्य क्षेत्रातले गोमंतकीयांचे दैवत पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांचे गेल्या बुधवारी १७ जूनला निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत नाट्य क्षेत्रातील एक पर्व संपले असे म्हणायला हरकत नाही. अगदी बालवयापासून अखेरपर्यंत, म्हणजेच तब्बल नव्वद वर्षे संगीत रंगभूमीची सेवा करणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत कलेत रमलेले गोमंतभूषण, नटश्रेष्ठ पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांच्या निधनाने गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून ती भरून निघणे अशक्य आहे.

संगीत आणि नाटक हाच त्यांचा ध्यास होता. बालवयातच त्यांनी वडीलांबरोबर नाटकाचे दौरे करायला सुरूवात केली आणि तिथूनच ते संस्कार त्यांच्यावर झाले. घरातच नाटक आणि संगीत असल्यामुळे त्याविषयी आवड होणे सहाजिकच होते. तेव्हापासूनच संगीत रंगभूमी हीच आपली कर्मभूमी मानून आपले सर्वस्व त्यासाठी वाहिले आणि हेच त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतल्यावर प्रकर्षाने जाणवते. मराठी संगीत रंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते संगीत नाटकातच रमले. अगदी त्यांच्या ९७ व्या वाढदिवशीही त्यांनी खड्या आवाजात तानपुरा लावून नाट्यगीत सादर केले आणि त्याचबरोबर नाटकाचे संवादही कोणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे म्हटले. यावरून संगीत नाटकाचा त्यांनी किती ध्यास घेतला होता आणि ते त्यांच्या नसानसांत किती भिनले होते, हे दिसून येते.

नाट्याभिनय आणि नाट्यसंगीत ही त्यांची बलस्थाने होती. व्यावसायिक नाटकात काम करता करता, शास्त्रीय गायन शिकणे त्यांनी चालूच ठेवले. अनेक गायकांकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या गानसंपदेत अनेक प्रचलित आणि अप्रचलित रागांचा समावेश होता. तसेच त्यांच्याकडे अनेक बंदिशींचा अमूल्य खजाना होता. याच बळावर त्यांनी नाट्यसंगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या तरुणपणी त्यांनी आपल्या पहाडी आणि आक्रमक आवाजात अनेक नाट्यगीते सादर करून रसिकांची मने जिंकली. 'जय गंगे भागीरथी', 'सप्तसूर झंकारित', 'देवाचिये द्वारी', 'नारायणा रमारमणा' अशी अनेक गाणी त्यांची गाजली. उतार वयात त्यांनी अभिनय केलेले 'अवघा रंग एकची झाला' हे नाटकही खूप गाजले.

१९८६ साली ते कुटुंबीयासहित गोव्यात कायमचे रहायाला आले. त्यापूर्वी अनेक वर्षे ते मुंबईत वास्तव्यास होते. त्या काळात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा तसेच परदेशातही त्यांनी संगीत नाटकाचे असंख्य प्रयोग सादर केले. संगीत नाटकाच्या सुवर्णकाळाचे ते साक्षीदार होते. संगीत नाटक जरी त्यांचा व्यवसाय होता तरी, ते नाटकाला कला म्हणून जास्त बघत होते आणि म्हणूनच व्यवसायापेक्षा संगीत नाटक हेच त्यांचे सर्वस्व होते.

रंगभूमीतील अनेक दशकं समृद्ध अनुभव घेऊन ते गोव्यात आले म्हणजेच, निवृत्त होऊन ते गोव्यात स्थायिक झाले. येथे गोव्यात त्यांनी अनेक नाट्य आणि संगीत कलाकारांशी जवळीक साधली आणि आपल्या अनुभवाच्या बळावर अनेकांना मार्गदर्शन केले. गोव्यातील अनेक गायक त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण आणि मार्गदर्शन घेत होते. त्यांनी मुक्तहस्ताने विद्यादान केले आणि अनेक सांस्कृतिक संस्थांनाही मार्गदर्शन केले.

नाट्यसंगीत हा त्यांच्या जीवनाचा प्राण होता. गोवा नाट्यसंगीत वेडा आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. याच धाग्याला धरून त्यांनी येथील तरुण गायकांना प्रोत्साहन देत अनेक दर्जेदार नाट्यसंगीताचे कार्यक्रम सादर केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्याचे राज्यसंगीत हेच नाट्यसंगीत आहे असे ते मानत. गोव्यात आयोजित होणाऱ्या शास्त्रीय संगीत संमेलनांना ते आवर्जून उपस्थित राहत आणि शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेत.

गोव्यातील अनेक वृत्तपत्रे आणि लेखकांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा खजिना लोकांसमोर आणला. नाटकातील विनोदी किस्से रंगवून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. अत्यंत प्रभावी आणि मिश्किल शैलीत ते हे प्रसंग सांगायचे आणि समोर बसलेला प्रत्येक श्रोता मनमुराद हसत होता. मुळातच त्यांचा स्वभाव विनोदी आणि मिश्किल होता. त्यांचे बोलणे ऐकणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे ही एक पर्वणीच असे. आपल्या ओघवत्या आणि खास शैलीत संवाद साधत ते समोरच्याचे मन सहज जिंकून घेत.

संगीत नाटकाचा सुवर्णकाळ अनुभवलेले, अनेक थोर आणि ज्येष्ठ कलाकारांसोबत काम केलेले आणि त्या पिढीतील हयात असलेले ते शेवटचे कलाकार होते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व होते. गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी त्यांनी नाट्य आणि संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांचे कार्य गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, यात शंका नाही.

स्वस्तिक संस्थेतर्फे आयोजित स्वरमंगेशच्या पहिल्या समारोहात भारतरत्न लता मंगेशकर यांचा सत्कार प्रसाद सावकार यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार तो क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंददायी आणि भावपूर्ण क्षण होता.

संगीत कार्यक्रमांच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी वारंवार संपर्क येत असे. अत्यंत आत्मीयतेने त्यांनी आम्हाला प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन केले. त्यांचा हसतमुख स्वभाव, एखाद्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह आणि सकारात्मक दृष्टीकोन यांमुळे त्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटायचा. संगीत आणि नाटक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. या गोमंतकीय थोर कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

- डॉ. प्रवीण गावकर