हा बेडूक केवळ भारतातील पश्चिम घाट प्रदेशातच आढळतो. त्यामुळे तो प्रदेशनिष्ठ प्रजाती म्हणून ओळखला जातो. मात्र जंगलतोड, मानवी अतिक्रमण, अधिवासाचे तुकडीकरण आणि ओढ्यांच्या परिसंस्थेतील बदल या कारणांमुळे त्याच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

पावसाळ्यातील पश्चिम घाटाचे सौंदर्य काही वेगळेच असते. पश्चिम घाटाच्या विविध छटा आपल्याला खासकरून पावसाळ्यातच पाहायला मिळतात. हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे, धुक्याची चादर आणि विविध वन्यजीव यामुळे पावसाळ्यात हा परिसर जिवंत झाल्यासारखा वाटतो. या काळात अनेक दुर्मिळ जीवांचे दर्शन घडते. त्यापैकी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेणारा जीव म्हणजे भारतीय जांभळा बेडूक. याला 'पिग-नोज्ड बेडूक' किंवा 'महाबली बेडूक' असेही म्हणतात.
भारतीय जांभळा बेडूक हा फक्त पावसाळ्यात दिसून येणारा एक अद्वितीय वन्यजीव आहे. याला अद्वितीय अशासाठी म्हणतात कारण हा वर्षातील बहुतांश काळ जमिनीखाली राहतो. ही गोष्ट ओणम सणाच्या वेळी पाताळातून पृथ्वीवर येणाऱ्या राजा महाबली यांच्या कथेशी साधर्म्य दर्शवते. या कारणामुळे या बेडकाला 'महाबली' म्हणून ओळखले जाते.
हा बेडूक केवळ पावसाळ्यात सुमारे दोन आठवड्यांसाठी जमिनीवर येतो. तो आपले उर्वरित आयुष्य जमिनीखाली घालवतो. आपली पिढी वाढवण्यासाठी तो फक्त दोन आठवडे प्रजननासाठी जमिनीखालून वर येतो. तो प्रामुख्याने वाळवी आणि मुंग्या यांवर आपला उदरनिर्वाह करतो. पावसाळ्यात हा बेडूक वेगाने वाहणाऱ्या ओढ्यांमध्ये प्रजनन करतो आणि त्यानंतर पुन्हा जमिनीखाली जातो.
टोकदार नाक, मजबूत पाय आणि लहान डोळे असलेला हा बेडूक नावाप्रमाणेच महाबली असतो. या बेडकाचे शरीर फुगलेले व गोलाकार असते. त्याची त्वचा गुळगुळीत आणि गडद जांभळ्या ते राखाडी-जांभळ्या रंगाची असते. पांढऱ्या, डुकराच्या नाकासारखे दिसणाऱ्या नाकामुळे त्याला 'पिग-नोज्ड बेडूक' असेही म्हणतात.
पावसाळ्याच्या सुरुवातीला नर बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी जमिनीवर येऊन वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आवाज काढतात. त्यानंतर मादी बेडूक नराला आपल्या पाठीवर घेऊन वेगाने वाहणाऱ्या ओढ्यांच्या काठावर जाते. तेथे खडकांच्या किंवा जमिनीतील भेगांमध्ये असलेल्या भूमिगत कपारींमध्ये ती अंडी घालते. साधारण ७ सेंटीमीटर लांबीच्या या बेडकाचे शरीर डोक्याच्या मानाने मोठे असते. या बेडकाचे पाय आखूड व मजबूत असतात. पुढच्या पायांवर फावड्यासारखी विशेष रचना असल्यामुळे तो आपल्या टोकदार नाकाचा आणि मजबूत पुढच्या पायांचा उपयोग करून ओलसर, भुसभुशीत मातीमध्ये मागील दिशेने बिळ खोदतो. हा बेडूक जमिनीखाली साधारण १० ते १५ फूट खोलीवर राहून प्रामुख्याने मातीतील वाळवी खातो.
भारतीय जांभळा बेडूक हा भारतातील पश्चिम घाट प्रदेशानिष्ठ प्राणी आहे. त्याचे पुढचे पाय आखूड, स्नायूयुक्त आणि कठीण तळव्यांचे असल्यामुळे त्याला जमिनीखाली सहज बिळे खोदता येतात. इतर बेडकांप्रमाणे त्याचे मागचे पाय लांब नसल्यामुळे तो उड्या मारू शकत नाही. त्यामुळे तो लांब पावले टाकत चालतो. जमिनीखालील वाळवी शोधण्यासाठी तो प्रामुख्याने आपल्या तीक्ष्ण वास ओळखण्याच्या क्षमतेचा वापर करतो.
हा बेडूक तलाव, चर किंवा ओढ्यांच्या जवळील भुसभुशीत, ओलसर आणि हवेशीर मातीमध्ये बिळे करून राहणे पसंत करतो. अशा ठिकाणी राहिल्यामुळे पावसाळ्यात प्रजननासाठी प्रौढ बेडकांना सहज बाहेर येता येते आणि मादी बेडूक पाण्यात अंडी घालते. या प्रजातीसमोरील सर्वात मोठा धोका म्हणजे मानवी अतिक्रमणामुळे होणारा अधिवासाचा ऱ्हास होय. त्यामुळे या अत्यंत दुर्मिळ बेडकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
हा बेडूक केवळ भारतातील पश्चिम घाट प्रदेशातच आढळतो. त्यामुळे तो प्रदेशनिष्ठ प्रजाती म्हणून ओळखला जातो. मात्र जंगलतोड, मानवी अतिक्रमण, अधिवासाचे तुकडीकरण आणि ओढ्यांच्या परिसंस्थेतील बदल या कारणांमुळे त्याच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दुर्मिळ आणि अद्वितीय प्राण्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)