आजच्या युवा पिढीला गरज आहे ती सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतून बाहेर पडण्याची, आई-वडिलांच्या अनुभवाचा आदर करण्याची आणि जबाबदार नागरिक बनण्याची. चुका या प्रत्येक वयात होतात, पण वेळेत मिळालेले सुसंस्कार आणि अनुभवातून आलेली परिपक्वता तरुणांना योग्य दिशा दाखवू शकते.

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आजची युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे, परंतु सद्यस्थितीत या पिढीसमोर अनेक वैचारिक, सामाजिक आणि मानसिक आव्हाने उभी ठाकली आहेत. बदलती जीवनशैली, सोशल मीडियाचा अतिवापर आणि सुसंस्कारांची कमतरता यामुळे आजचा तरुण एका वेगळ्याच चक्रव्यूहात अडकलेला दिसतो.
भारतात रोजच्या जगण्यात छोटे-मोठे गुन्हे करणे किंवा नियम मोडणे अत्यंत सामान्य मानले जाते. रस्त्यावर कचरा टाकणे, चालता-फिरता थुंकणे किंवा सार्वजनिक कोपऱ्यात लघुशंका करणे, हे चित्र आपल्याला रोज पाहायला मिळते. अनेक तरुणांनी प्रगत देशांमधील शिस्त पाहिलेली नसते (किंवा कधी कधी पाहिलेली असते); पण जेव्हा ते इथे येऊन नियमांची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करतात, तेव्हा ते स्वतःला पोलीस किंवा मोठे समाजसेवक समजतात. चालत्या गाडीची काच खाली करून प्लास्टिकच्या बाटल्या किंवा वेफर्सचे रॅपर रस्त्यावर फेकणारे अनेक सुशिक्षित तरुण आपण हमखास पाहतो. या छोट्या चुकांचे समर्थन अजिबात करता येणार नाही, पण दुसरीकडे देशात याहून अधिक भयंकर गुन्हे करणारे लोक मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही.
अनेकदा एखाद्या निष्पाप, साध्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला जातो. याला ती व्यक्ती नाही, तर भ्रष्ट पोलीस यंत्रणा जबाबदार असते. ज्यांना साध्या अपघाताचा ‘स्केच’ काढता येत नाही, ते पोलीस बनले आहेत. ते एकतर चुकीचा पंचनामा तयार करतात किंवा पैसे घेऊन खोटा पंचनामा बनवतात. आपल्या देशाची सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की, अशा अशिक्षित, दर्जाहीन प्रवृत्तीच्या माणसांना आणि भ्रष्ट मंत्र्यांना आपल्याला 'सर' म्हणावे लागते. कोणताही स्वाभिमानी तरुण अशा लोकांना मनातून कधीच 'सर' मानू शकत नाही, तर त्यांना नावानेच हाक मारणे पसंत करतो.
आजच्या युवा पिढीत सहनशक्ती प्रचंड कमी झाली आहे. बऱ्याचदा त्यांच्या योग्य पालनपोषणात किंवा संस्कारात काहीतरी उणीव राहून जाते. समाजात वावरताना कधीतरी बदनामी किंवा अपमान होतच असतो; पण जर प्रत्येक अपमानाला घाबरून आत्महत्येचा विचार केला, तर माणसाला रोजच आत्महत्या करावी लागेल. केवळ वय वाढल्याने माणूस मोठा होत नाही, तो अनुभवाने मोठा होतो. लहान वयातच जीवनाचे चटके सोसलेला, बरे-वाईट अनुभव घेतलेला तरुण अत्यंत परिपक्व असू शकतो. याउलट, वय झाले तरी कोणतीही जबाबदारी न सांभाळलेला किंवा संघर्ष न पाहिलेला वयस्कर माणूसही बालिश राहू शकतो.
युवा पिढीला अनेकदा बऱ्या-वाईटाची योग्य समज नसते. कुणी काही बोलले की त्यांना लगेच राग येतो. मागचा-पुढचा विचार न करता ते टोकाचे पाऊल उचलतात, कारण त्या वयात भावनांवर ताबा नसतो. तसा प्रत्येक माणूस आयुष्यात या वयातून आणि या मानसिक स्थितीतून जातच असतो. पुढे जाऊन जेव्हा वय वाढते, तेव्हा आपल्याला तरुणपणात केलेल्या चुकांची जाणीव होते आणि पश्चात्ताप होतो.
आजकाल काल-परवा भेटलेल्या व्यक्तीसोबत तरुण मुले-मुली लग्नाची स्वप्ने रंगवू लागतात. स्वतःच्या प्रेमाची तुलना थेट राम-सीतेच्या पवित्र नात्याशी करून ते एकप्रकारे श्रीरामाचाही अपमान करत असतात. प्रत्येक प्रेमिकेला वाटते की आपलाच प्रेमी महान आहे आणि तो काहीही करू शकतो. पण जो स्वतः कमकुवत असतो आणि दुसऱ्यांच्या जीवावर उड्या मारतो, त्याला जास्तच माज असतो, हे त्यांना समजत नाही. हल्ली समाजात घटस्फोटांचे प्रमाण वाढण्यामागे हीच उथळ विचारसरणी कारणीभूत आहे. 'आपले मूल काही चुकीचे पाऊल उचलेल किंवा आत्महत्या करेल' या भीतीने पालक त्यांच्या प्रेमविवाहाला होकार देतात. पण लग्न झाल्यावर काही दिवसांतच सून किंवा जावई आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करतात. विशेषतः 'हाय-फाय', पॉश आणि उच्च पदांवर असलेल्या सुशिक्षित घरांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण जास्त दिसते. याचे कारण अहंकार, एकमेकांना समजून न घेणे आणि पैशाचा माज हे असू शकते. दोन ज्येष्ठ माणसे जेव्हा बोलत असतात, तेव्हा तरुण पिढीला त्यांचा सल्ला राग आणणारा वाटतो. पण जेव्हा तो तरुण स्वतः वडिलांच्या वयाचा होईल, एका मुलाचा बाप होईल, तेव्हा त्याला समजेल की आपले वडील त्यावेळी जे सांगत होते ते अगदी बरोबर होते. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. माणूस जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडा होतो, तेव्हा त्याची स्वतःची विवेकबुद्धी काम करणे बंद होते. याच आंधळ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो आणि मग 'पुणे' सारखे एखादे धक्कादायक प्रकरण समोर येते. समोरची व्यक्ती जर गरजेपेक्षा जास्तच प्रेम आणि जवळीक दाखवत असेल, तर तिथेच सावध होण्याची गरज असते.
अति-प्रेमाच्या त्या देखण्या मुखवट्यामागे नक्की कोणता लपलेला हेतू दडला आहे, हे वेळीच ओळखता यायला हवे. कारण प्रेमाच्या नावाखाली जेव्हा फसवणुकीचे कारस्थान रचले जाते, तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.
आजच्या काळातील सर्वात मोठे वास्तव म्हणजे, प्रत्येक तरुण स्वतःला सोशल मीडियाचा 'पत्रकार' किंवा 'क्रांतिकारक' समजतो. सोशल मीडियावर पोस्ट टाकून क्रांती करणे आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणे यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. तुमच्या फोटोला ५०० लोक 'लाईक' करतील, पण कठीण प्रसंगी मदतीला २ लोक येणेही कठीण होते. आभासी कौतुकाची हाव कधीच संपत नाही. प्रत्यक्षात रस्त्यावरील माणसाने केलेले कौतुक जास्त आनंद देते. तुम्ही लिहिलेल्या लेखावर तुमचा एकही मित्र प्रतिक्रिया देणार नाही, पण जेव्हा एखाद्या अनोळखी माणसाकडून फोन किंवा मेसेज येतो, तेव्हा खूप बरे वाटते. तुमच्या मित्रांसाठी तुमचे लेख म्हणजे 'घरची कोंबडी डाळ बरोबर' या म्हणीसारखे असते, हे लक्षात ठेवा. माणसाचा स्वभावही किती विचित्र आहे पहा; त्याला सोशल मीडियावर ५०० लाईक्स मिळाले तरी ते कमीच वाटतात, पण प्रत्यक्षात रस्त्याने चालताना जर दोन व्यक्तींनी प्रामाणिकपणे म्हटले की, "आज तुम्ही छान दिसत आहात," तर ते मनाला जास्त समाधान देऊन जाते.
आजच्या युवा पिढीला गरज आहे ती सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतून बाहेर पडण्याची, आई-वडिलांच्या अनुभवाचा आदर करण्याची आणि जबाबदार नागरिक बनण्याची. चुका या प्रत्येक वयात होतात, पण वेळेत मिळालेले सुसंस्कार आणि अनुभवातून आलेली परिपक्वता तरुणांना योग्य दिशा दाखवू शकते. युवा शक्ती ही देशाची खरी संपत्ती आहे, फक्त तिला योग्य मार्गदर्शनाची आणि आत्मपरीक्षणाची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही.
- आदित्य सिनाय भांगी, पणजी