Home >> ताज्या बातम्या >> गोवा काँग्रेस पक्षावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

गोवा काँग्रेस पक्षावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

युरी, पाटकर यांचे मौन; आज वेणुगोपालांसोबत बैठक


03rd July, 11:31 pm
गोवा काँग्रेस पक्षावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

मोपा विमानतळावरून बाहेर पडताना के. सी. वेणुगोपाल. सोबत माणिकराव ठाकरे, अंजलीताई निंबाळकर व इतर.

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : राज्यात ‘गोवा काँग्रेस पक्ष’ स्थापन करण्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव आणि माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमदार आणि खासदारांनी मौन बाळगले असले, तरी मतविभाजन घडवून आणण्यासाठी हा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल शनिवारी बैठक घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि रणनीतीवरही या बैठकीत चर्चा होणार असून, गोवा काँग्रेस पक्षाच्या हालचालींमुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली असली, तरी माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव यांनी सार्वजनिकपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच भाजपनेही गिरीश चोडणकर यांनी केलेल्या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होणारी बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत ‘गोवा काँग्रेस पक्ष’ विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री के. सी. वेणुगोपाल यांचे गोव्यात आगमन झाले. मोपा विमानतळावर गोवा प्रभारी माणिकरावर ठाकरे, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी नव्या पक्षाची स्थापना करण्यामागे भाजपचा डाव असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यावर भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी गिरीश चोडणकर यांनी मानसिक आरोग्याची तपासणी करावी, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते सिद्धेश नाईक यांनीही हे आरोप फेटाळून लावले. या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाबाबत हरकती मागविण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.
वेणुगोपाल यांची बैठक पूर्वनियोजित
राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे निवडणूक होणाऱ्या राज्यांना नियमित भेटी देऊन पक्ष संघटनेचा आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतात. त्यांची गोवा भेट आणि बैठक पूर्वनियोजित असून तिचा नव्या पक्षाशी कोणताही संबंध नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.
कोण काय म्हणाले...
विरोधी मतांचे विभाजन करून भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्याच्या उद्देशाने नव्या पक्षाची स्थापना केली जात आहे. गोव्यात काँग्रेस पक्ष एकसंघ असून कोणत्याही परिस्थितीत पक्षात फूट पडणार नाही. ज्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे, त्यांचे पक्षात स्वागतच केले जाईल.
_ माणिकराव ठाकरे, गोवा काँग्रेस प्रभारी
..
धर्मनिरपेक्ष मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी ‘गोवा काँग्रेस पक्ष’ ही भाजपने रचलेली खेळी आहे.
_ तुलियो डिसोझा, उपाध्यक्ष, गोवा काँग्रेस
...
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्या नाराजीतूनच नव्या पक्षाची स्थापना होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये मान्यता नसलेल्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता नव्या पक्षाची स्थापना होत आहे. या पक्षामागे भाजपचा कोणताही हात नाही.
_ एरमितो रिबेलो, फादर
..
कोणालाही पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे. मात्र काँग्रेसच्या नावाने पक्ष स्थापन होत असल्याने काँग्रेसने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गोवा फॉरवर्डची काँग्रेसशी आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी स्वतःची संघटना मजबूत करावी.
_ आमदार विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड
..
नवा पक्ष स्थापन करण्यासाठी मतदार यादीतील किमान १०० सदस्य आवश्यक असतात. त्यामध्ये अध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार आणि कार्यकारिणी समितीचा समावेश असतो. काँग्रेसच्या नावाने नव्या पक्षाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे, तसेच निवडणूक आयोगाने हरकतींसाठी नोटीस जारी केल्याचे सांगितले जात असले, तरी याबाबत अद्यापही संभ्रमाची स्थिती आहे.
_ अॅड. श्रीनिवास खलप, पदाधिकारी, काँग्रेस