म्हापसा :कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये मालपे-उडुपी येथील संदीप सुवर्णा (४२) या पर्यटकाचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांच्या ‘ओव्हरडोस’मुळे झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी अक्षता एम. के. उर्फ रूपश्री सी. (३५, रा. नंथूर, मंगळुरू) या संशयित महिलेला अटक करण्यात आली असून, तिने गुंगीचे औषध देऊन पर्यटकांना लुटण्याची पद्धत अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बंगळुरूतून अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
बंगळुरू येथून शुक्रवारी (३ जुलै) कळंगुट पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने संशयित अक्षता हिला अटक केली. बंगळुरू प्रथमश्रेणी न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून तिला गोव्यात आणण्यात आले. त्यानंतर शनिवारी म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संशयित अक्षता ही एमबीए पदवीधर असून साडी ड्रेपिंग एक्स्पर्ट म्हणून काम करत होती. गोव्यातील कॅसिनोमध्ये येणाऱ्या श्रीमंत पर्यटकांना लक्ष्य करून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवणे, गुंगीचे औषध देऊन लुटणे आणि दागिने चोरणे, अशी तिची कार्यपद्धती असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. तिला कन्नड आणि इंग्रजी या दोनच भाषा अवगत आहेत.
चोरीची सोनसाखळी गळ्यात घालून फिरत होती
संदीप यांच्या मृत्यूनंतर संशयित महिलेने त्यांची महागडी सोनसाखळी स्वतःच्या गळ्यात घातली होती. बंगळुरूमध्ये फिरताना तसेच पोलिसांनी अटक केली तेव्हाही तीच सोनसाखळी तिच्या गळ्यात होती. झोपेच्या गोळ्यांमुळे संदीप यांचा मृत्यू होईल, याची तिला कल्पना नव्हती. बंगळुरू न्यायालयात हजर केल्यानंतरच तिला मृत्यूची माहिती मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.
गोव्यात अक्षता 'रूपश्री सी' हे खोटे नाव आणि चुकीचा मोबाईल क्रमांक वापरत होती. मात्र, कॅसिनोतील एका कर्मचाऱ्याकडे तिचा खरा मोबाईल क्रमांक उपलब्ध होता. त्याच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तिचा माग काढून बंगळुरूतून अटक केली. यापूर्वीही तिने अनेकांना लुटल्याचा संशय असून, बदनामीच्या भीतीने बहुतांश पीडितांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
१) मूळची नंथूर (मंगळुरू) येथील असलेली अक्षता विवाहित असून तिचा पती शेतकरी आहे. त्यांना दोन मुले आहेत.
२) शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसल्याने पोलिसांना आता व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे.
३) या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे आणि हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर करत आहेत.


