पणजी :जून महिन्यातील विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पावसाची संततधार कायम असल्याने विविध धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. मागील काही दिवसांतील या दमदार पावसामुळे धरणांची पाणीपातळी समाधानकारक स्थितीत पोहोचली असून, पावसाचा हा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
चार दिवसांत धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन ५ जून रोजी झाले. सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे पुन्हा भरू लागली आहेत. चार दिवसांत गावणे धरणातील पाणीसाठा ६.८ टक्क्यांनी वाढून ३ जुलैअखेर ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, आमठाणे धरणातील पाणीसाठा ३० जून रोजीच्या ५५.९ टक्क्यांवरून वाढून ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अंजुणे धरणातील पाणीसाठा ३० जून रोजी ११ टक्के होता. तो ३ जुलैअखेर वाढून १४.१ टक्के झाला आहे. तिळारी धरणातील पाणीसाठाही चार दिवसांत २.७ टक्क्यांनी वाढून ३१.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय राज्यातील इतर लहान-मोठ्या धरणांतील पाणीसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे.
शनिवारी राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या, तर काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. गेल्या २४ तासांत ०.९४ इंच पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ४ जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ३०.४० इंच पाऊस झाला असून, यंदाचा पाऊस अद्याप सरासरीपेक्षा २७.४ टक्क्यांनी कमी आहे.


