Home >> ताज्या बातम्या >> वेणुगोपालांसमोर असंतोषाचा स्फोट

वेणुगोपालांसमोर असंतोषाचा स्फोट

काँग्रेसची आढावा बैठक तापली : असंतुष्टांकडून वरिष्ठ नेत्यांवर प्रश्नांचा भडिमार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 10:07 pm
वेणुगोपालांसमोर असंतोषाचा स्फोट

गोवा प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस पक्षात उफाळून आलेला अंतर्गत वाद अब चव्हाट्यावर आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी शनिवारी गोव्यात घेतलेल्या आढावा बैठकीत माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह अनेक असंतुष्ट नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. यावर स्पष्टीकरण देताना वेणूगोपाल यांनी चोडणकर यांची पाठराखण केली आहे.

शनिवारी सकाळी दोनापावला येथील ‘ताज सिदाद दे गोवा’掘 हॉटेलमध्ये गोवा काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ आणि काँग्रेसच्या नावाने स्थापन झालेल्या नव्या पक्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेणूगोपाल यांनी हे प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीला गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित होते. पदाधिकारियोंची ही बैठक चांगलीच तापली आणि अनेकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.

पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा

या बैठकीपूर्वी वेणूगोपाल यांनी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. या चर्चेदरम्यान असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. चोडणकर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते दुखावल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आम्हाला विश्वासात न घेता अध्यक्ष कसा बदलला, असा प्रश्न नाराज नेत्यांनी विचारला.

कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावे

गेली साडेचार वर्षे आम्ही गोव्यात पक्षासाठी काम करून संघटना उभी केली आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देत त्यांना प्रोत्साहन दिले. काँग्रेस हा काही मोजक्या लोकांचा पक्ष नसून, अनेक कार्यकर्त्यांनी वेळ, पैसा, मेहनत आणि रक्त आटवून पक्षासाठी काम केले आहे. अशा कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. लोकशाही पक्षात मत मांडण्याची संधी असलीच पाहिजे आणि मी माझे मत मांडले असून, वेणूगोपाल यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

नेतृत्व मेहनतीने तयार केले

आज ४० मतदारसंघांत ४० नेते असल्याचा दावा केला जातो, पण हे नेतृत्व आम्ही भाजपविरुद्ध साडेचार वर्षे संघर्ष करून तयार केले आहे. त्या काळात आज पुढे आलेले अनेक नेते दिसतही नव्हते. अध्यक्ष बदलायचाच असेल तर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. अमित पाटकर बदलला हा मुद्दा नाही; पण तो का बदलला? निवडणुकीला अवघे सहा महिने असताना हा निर्णय का घेतला? वारंवार राजीनामा देणाऱ्या व्यक्तीलाच पुन्हा अध्यक्ष का करण्यात आले? असे प्रश्न विचारत आमची लढाई चोडणकरांविरुद्ध नसून भाजपविरुद्ध आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

निलंबित नेत्यांबाबत स्पष्टीकरण

निलंबित नेत्यांना बैठकीत बोलावले जाणार नाही, असे एम. के. शेख यांनी आम्हाला सांगितले होते. बैठकीत जे काही घडले ते आम्ही स्पष्टपणे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले असून, सर्वांशी चर्चा करण्याचे आश्वासन वेणूगोपाल यांनी दिले असल्याचे पाटकर म्हणाले.

चोडणकर हे सोन्यासारखे माणूस

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि पक्ष नेतृत्वानेच गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. चोडणकर यांची तत्त्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा आम्हाला माहीत असून, ते पक्षात काल-परवाचे (नवे) नेते नाहीत. त्यांनी २५ ते ३० वर्षे विविध पदांवर काम केले आहे. आरोप कोणीही करू शकतो; पण प्रामाणिकपणाच्या बाबतीत ते काँग्रेसमधील सोन्यासारखे माणूस आहेत, त्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप मी फेटाळून लावतो, असे स्पष्टीकरण के. सी. वेणूगोपाल यांनी केले.

आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असल्याचे सांगत गोव्यात सध्या भाजपविरोधी वातावरण असून, विकासाच्या नावाखाली राज्याची लूट आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी केला.

विकासाच्या नावाखाली गोव्याची मौल्यवान जमीन लुटली जात असून, ती इतर कारणांसाठी वापरली जात आहे. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून गोव्याचे भविष्य धोक्यात आले आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढला असून त्याला भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे संरक्षण आहे, असे वेणूगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संघटनात्मक बांधणीवर भर

या बैठकीत संघटनात्मक गरजा आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला. यामध्ये बीएलए-२ नियुक्त्या, बूथ समित्या, कायदे समित्यांची स्थापना आणि प्रदेश समितीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

नव्या पक्षाची चिंता नाही

‘गोवा काँग्रेस पार्टी’ या नव्या पक्षाबाबत विचारले असता, राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र हा पक्ष किती काळ टिकेल हे लवकरच दिसून येईल. कोणत्याही पक्षाला मते मिळाली तरी त्याची आम्हाला चिंता नाही, असे वेणूगोपाल यांनी स्पष्ट केले.

आम्ही ‘काँग्रेस संवाद’ ही संकल्पना सुरू केली असून...आतापर्यंत सहा-सात बैठका झाल्या आहेत. सर्व ४० मतदारसंघांत बैठकांचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसला पर्याय नाही असे वाटणारे अनेक लोक पक्षात दाखल झाले आहेत. २२ सप्टेंबरपासून ‘गोवा राखण यात्रा’ सुरू करण्याबाबत चर्चा झाली. २०२७ मध्ये काँग्रेसच्या २७ जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
वेणूगोपाल यांनी शुक्रवारी विविध नेत्यांशी चर्चा केली...शनिवारी सकाळी संघटनेतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा झाली. त्यानंतर पीएसी बैठकीला त्यांनी संबोधित केले. प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख आणि गटाध्यक्ष यांच्याशीही त्यांनी बैठक घेतली.

- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, गोवा काँग्रेस

नि:स्वार्थीपणे पक्ष मजबूत करा : वेणूगोपालांचा कानमंत्र

एकसंघ राहा, बूथस्तरावरील कार्यकर्त्यांवर लक्ष केंद्रित करा आणि काँग्रेसने गोव्याला काय दिले हे जनतेपर्यंत पोहोचवा, असा संदेश वेणूगोपाल यांनी दिला. कार्यकर्त्यांनी पक्षाची शिस्त पाळावी. एकजुटीने काम केले तर आगामी निवडणुकीत काँग्रेसचे सरकार निश्चित सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंतर्गत मतभेद आणि तक्रारी पक्षश्रेष्ठींसमोर मांडाव्यात. त्या सोशल मीडियावर किंवा अन्य माध्यमांतून सार्वजनिक करू नयेत. पक्षाचे निर्णय मान्य नसतील तर पुढील निर्णय घेण्यासाठी संबंधितांना मार्ग मोकळा आहे, असे स्पष्ट शब्दांत वेणूगोपाल यांनी प्रदेश समितीच्या बैठकीत उपस्थित नेत्यांना सुनावले.

हेही वाचा
सर्व पहा