खासगी दुचाकींवर प्रवासी वाहतूक केल्यास वाहन जप्त; 'माझे ड्रायव्हर' मोबाईल ॲपचे उद्घाटन

पणजी : खासगी मोटारसायकलींचा वापर करून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक (भाडे) केल्याचे आढळल्यास संबंधित दुचाकी जप्त करण्यात येईल. याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पणजी येथे आयोजित कार्यक्रमात मोटारसायकल पायलटांसाठी 'माझे ड्रायव्हर' या मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, वाहतूक खात्याचे अधिकारी तसेच मोटारसायकल पायलट संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित होते.
५० वर्षे पूर्ण केलेल्या पायलटना मिळणार योजनेचा लाभ
मुख्यमंत्री सावंत यांनी मोटारसायकल पायलटांच्या हितासाठी महत्त्वाच्या घोषणा करताना, इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ५० वर्षे पूर्ण केलेल्या मोटारसायकल पायलटना १ ऑगस्टपासून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
'माझे ड्रायव्हर' ॲप हे मोटारसायकल पायलट संघटना, ग्रेसफुल गोवा सुपर ॲप प्रायव्हेट लिमिटेड आणि वाहतूक खात्याच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे. या ॲपसाठी ग्रेसफुल गोवा सुपर ॲप कंपनीकडून पायलटना मोफत स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, हे ॲप वापरणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्या पायलटना ॲपचा वापर करायचा नसेल, ते पूर्वीप्रमाणेच बसस्थानकांवर उभे राहून प्रवासी सेवा देऊ शकतील.
राज्यात पूर्वी सुमारे ५ हजार मोटारसायकल पायलट कार्यरत होते. मात्र, हा आकडा आता सुमारे २ हजारांवर आला आहे. मोटारसायकल पायलट हे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचे महत्त्वाचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी काढले.