Home >> देश -परदेश >> श्रीलंकेतील तुरुंगात कैद्यांमध्ये भीषण संघर्ष; २५ जणांचा मृत्यू

श्रीलंकेतील तुरुंगात कैद्यांमध्ये भीषण संघर्ष; २५ जणांचा मृत्यू

शंभरहून अधिक जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 mins ago
श्रीलंकेतील तुरुंगात कैद्यांमध्ये भीषण संघर्ष; २५ जणांचा मृत्यू

कोलंबो : श्रीलंकेतील नेगोम्बो येथील अतिगर्दीच्या कारागृहात दोन गटांतील कैद्यांमध्ये झालेल्या भीषण संघर्षात किमान २५ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. (25 people were killed and around 100 others injured in a clash between two groups of prisoners in Sri Lanka) मृतांमध्ये कैद्यांसह काही कारागृह अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रविवारी सुरू झालेला हा वाद सोमवारी हिंसक वळणावर गेला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर काही कैद्यांनी कारागृहातील शस्त्रे ताब्यात घेतल्याने मोठा रक्तपात झाला. घटनेनंतर संपूर्ण कारागृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नेगोम्बो हे शहर श्रीलंकेची व्यावसायिक राजधानी कोलंबोपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचेही सांगितले जात आहे.

प्राथमिक तपासानुसार, कारागृहातील अमली पदार्थांच्या तस्करीला पाठिंबा देणाऱ्या आणि त्याला विरोध करणाऱ्या दोन गटांमध्ये हा संघर्ष उफाळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हिंसाचाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेनंतर विशेष कार्यदल (STF) तैनात करण्यात आले असून कारागृहा भोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्या तीन कैद्यांना पल्लान्सेना तुरुंग छावणीत हलविण्यात आले आहे.

लष्करालाही सतर्कतेच्या सूचना 

दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्रीलंकेच्या लष्करालाही सतर्क ठेवण्यात आले आहे. लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर वरुणा गमगे यांनी आवश्यकतेनुसार पोलिसांना मदत करण्यासाठी सैन्य सज्ज असल्याचे सांगितले.

घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी कारागृह आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, न्यायमंत्री हर्षणा नानायक्कारा यांनी या हिंसाचाराचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.जखमी कैद्यांना पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांची व जखमींची अचूक संख्या निश्चित करण्याचे काम अद्याप सुरू आहे.




हेही वाचा
सर्व पहा