निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचा घणाघात

पणजी: मांडवी नदीतील ऑफशोअर कॅसिनो हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'इनफ इज इनफ' (Enough is Enough) या जनआंदोलनाचे नेते आणि निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी गोव्यातील आतापर्यंतच्या सर्व सरकारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मांडवी नदीतील ऑफशोअर कॅसिनो प्रादेशिक जलसीमेत (Territorial Waters) हलवण्यासंदर्भातील कायदेशीर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात गोवा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पहा व्हिडिओ.
निवृत्त न्यायमूर्ती रिबेलो यांनी आंदोलनाच्या वतीने सांगितले की, कॅसिनो जहाजे नदीबाहेर हलवण्यासाठी न्यायालयाने आणि कायद्याने निश्चित केलेली मुदत केव्हाच संपली आहे; मात्र असे असूनही सरकारी पातळीवरील कमालीच्या निष्क्रियतेमुळे ही जहाजे आजही मांडवी नदीतच आपले संचालन करत आहेत. शासनाकडून या बेकायदेशीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप या त्यांनी केला आहे.
त्यांनी कॅसिनोच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या कडक अंमलबजावणी नियमांचा (Enforcement Rules) अभाव का असा सवाल प्रशासनाला विचारला आहे. तसेच, हे कॅसिनो हटवण्याऐवजी त्यांच्या परवान्यांना आणि संचालनाला वारंवार दिली जाणारी मुदतवाढ कोणत्या आधारावर दिली जात आहे, असा खडा सवालही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
केवळ व्यावसायिक हितासाठी गोव्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि कायद्याचा बळी दिला जात असल्याने तरुणाई आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, असे म्हणत न्या. रिबेलो यांनी 'इनफ इज इनफ' चळवळीच्या माध्यमातून गोवा सरकारला या संवेदनशील मुद्द्यावर आपली अधिकृत भूमिका काय आहे, हे संपूर्ण गोमंतकीय जनतेसमोर तात्काळ स्पष्ट करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.