एका दिवसात वाळपई अग्निशामक दलाला २६ आपत्कालीन कॉल

वाळपई : सत्तरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, ५ व ६ जुलै या अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत वाळपई अग्निशामक केंद्राकडे तब्बल २६ आपत्कालीन कॉल प्राप्त झाले. रस्ते, वीजवाहिन्या आणि घरांवर कोसळलेल्या झाडांमुळे अनेक भागांतील वाहतूक व वीजपुरवठा विस्कळीत झाला. मात्र वाळपई अग्निशामक दलाने प्रत्येक ठिकाणी तातडीने धाव घेत झाडे हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली.
या कालावधीत सर्वाधिक फटका चोर्लाघाट–केरी मार्गाला बसला. पहाटेपासूनच जंगलातील मोठमोठी झाडे एकामागोमाग एक रस्त्यावर कोसळत राहिली. आकेशियासह विविध प्रकारची उंच झाडे महामार्गावर पडल्यामुळे गोवा–बेळगाव मार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प झाली. अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अग्निशामक दलाला त्याच परिसरात वारंवार जाऊन झाडे हटविण्याचे काम करावे लागले. त्यामुळे घाटातील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आली.
ठाणे- येथील टाटा फार्म कंपनीजवळ सकाळी मोठे जंगलातील झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यानंतर नानेली येथील दत्त मंदिराजवळ झाड थेट वीजवाहिन्यांवर आणि रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला. अग्निशामक दलाने वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत झाड हटवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यास मदत केली.
त्यानंतर भुईपाल येथील एसीजीएल कंपनीजवळ आंब्याचे मोठे झाड रस्त्यावर कोसळले. केवाडे-रावण केरी सातेरी मंदिर परिसरात अंतर्गत रस्त्यावर आकेशियाचे झाड पडले, तर त्याच भागात फणसाचे झाड वीजवाहिनीवर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. पर्ये गुरववाडा येथे रोशन राणे यांच्या घराजवळ फणसाचे झाड वीजवाहिनी व रस्त्यावर कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशामक दलाने झाड हटवून वाहतूक आणि वीज दुरुस्तीचा मार्ग मोकळा केला.
दाबे येथील अंतर्गत रस्त्यावर फणसाचे झाड कोसळल्याने ग्रामस्थांची ये-जा काही काळ बंद झाली होती. पाटवळ(बिंबल-बराजण) येथे जंगलातील झाड वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तसेच कोपार्डे येथील गोवा डेअरी फार्म परिसरात वीजवाहिनीवर पडण्याच्या स्थितीत असलेले धोकादायक आंब्याचे झाड सुरक्षितरीत्या हटवून मोठी दुर्घटना टाळण्यात आली.
या सर्व घटनांमध्ये धामशे येथील घटना सर्वाधिक गंभीर ठरली. येथे विठ्ठा जयराम गावंकर यांच्या घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. मात्र अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य हाती घेतल्याने घराचे आणखी मोठे नुकसान टळले आणि सुमारे १ लाखांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात यश आले.
सायंकाळच्या सत्रातही आपत्कालीन घटनांची मालिका सुरूच राहिली. होंडा येथील सरकारी हायस्कूलजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. केरी पोलीस चौकी परिसरात आंब्याचे झाड कोसळले, तर पर्ये येथील हरे कृष्णा पेट्रोल पंपाजवळ नारळाचे झाड थेट वीजवाहिनीवर पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. वेळूस सरकारी प्राथमिक विद्यालय शाळेजवळ काजूचे झाड रस्त्यावर कोसळले, तर नाणूस सरकारी प्राथमिक शाळेजवळ जंगलातील मोठे झाड रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली.
या सर्व कारवायांमध्ये ज्ञानेश्वर जी. गावस, कृष्णा सी. नाईक, दत्ताराम आर. देसाई, आनंद ए. शेटकर आणि अरविंद एन. देसाई यांच्यासह वाळपई अग्निशामक केंद्रातील अधिकारी व जवानांनी दिवस-रात्र सेवा बजावत प्रत्येक आपत्कालीन कॉलला त्वरित प्रतिसाद दिला. सततच्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे सत्तरी तालुक्यात अजूनही अनेक झाडे धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढाच प्रवास करावा, मोठ्या झाडांखाली वाहने उभी करू नयेत आणि वीजवाहिन्यांवर झाड पडल्यास तत्काळ अग्निशामक दल व वीज खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उशिरापर्यंत बचावकार्य सुरू
रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे बचावकार्य सुरूच होते. तामडीगी (पर्ये) येथे रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री रेडीघाट (वाळपई) येथे झाड वीजवाहिनी आणि रस्त्यावर कोसळल्याने पुन्हा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पहाटे शिगणे पिसुर्ले येथेही रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली. दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून झाड हटवून मार्ग मोकळा केला.
खडकी येथे घरावर झाड कोसळून लाखोंची हानी
सत्तरी तालुक्यात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका खडकी येथील अरविंद शिवाजी माळशेकर यांच्या कुटुंबाला बसला. घराशेजारी असलेले मोठे झाड त्यांच्या घरावर कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डिचोली : डिचोली तालुक्यात सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.साखळी येथील गृहनिर्माण वसाहतीजवळील हमरस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना एका महिलेवर झाडाची फांदी कोसळली. या दुर्घटनेत महिला जखमी झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून महिलेवर उपचार सुरू आहेत.
मडगावात घरावर झाड पडून ५५ हजारांचे नुकसान
मडगाव : मडगाव आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. मालभाट येथे व्हिक्टर इस्पितळानजीक घरावर झाड कोसळून ५५ हजारांचे नुकसान झाले. याशिवाय विविध ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडून वाहतुकीवर परिणाम झाला.
वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे मडगाव व परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. यात वित्तहानी झाली. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली. नावेली येथील राष्ट्रीय महामार्गावरील चर्चनजीक तसेच माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांच्या घराजवळ रस्त्यावर पडलेली झाडे अग्निशामक दलाने हटवली. तसेच, शिरवडे येथील इझी बाय शोरूमजवळ आणि नावेलीतील लुसिया जनरल स्टोअरजवळ पडलेले वडाचे झाड व माड हटवण्यासाठी अग्निशामक दलाला साडेचार तास परिश्रम घ्यावे लागले.
वाळपई : गेल्या दोन दिवसांपासून सत्तरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा फटका सत्तरीतील मौळे ग्रामपंचायत क्षेत्रातील दाबे गावालाही बसला. दाबे येथील तुळशीदास माळशेकर यांच्या घरावर मोठे झाड कोसळल्याने घराचे छप्पर आणि आतील घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, वाळपई अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे सुमारे १ लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.
डिचोली मार्केटमधील पत्रे पुन्हा उडाले; आमदारांकडून तातडीने दुरुस्तीचे आदेश
डिचोली : डिचोली पालिका मार्केटच्या छताचे पाच ते सहा दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने भाजी व फळ विक्रेत्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सोमवारी बाजार परिसराची पाहणी करून परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आगामी दोन ते तीन दिवसांत आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.