Home >> ताज्या बातम्या >> एका दिवसात तब्बल ५६ हजार वाहतूक नियमभंगाच्या घटना

एका दिवसात तब्बल ५६ हजार वाहतूक नियमभंगाच्या घटना

१५ जुलैपासून एआय कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमभंगावर दंड


3 hours ago
एका दिवसात तब्बल ५६ हजार वाहतूक नियमभंगाच्या घटना

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : राज्यात सध्या २६ ठिकाणी एआय कॅमेरे कार्यरत आहेत. सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहनचालकाला केवळ संदेश (एसएमएस) पाठविला जात असून दंड आकारला जात नाही. मात्र, १५ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर थेट दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे. ४ जुलै रोजी एका दिवसात तब्बल ५६ हजारांहून अधिक वाहतूक नियमभंगाच्या घटना नोंदविण्यात आल्या, अशी माहिती वाहतूक मंत्री माॅविन गुदिन्हो यांनी दिली.
एका दिवसात नोंद झालेल्या ५६,३५६ नियमभंगाच्या घटनांमध्ये सर्वाधिक ४३,३५२ जणांनी सीटबेल्टचा वापर केला नव्हता, १३,०७२ वाहनांकडे विमा नव्हता, २,४६८ जण हेल्मेटशिवाय वाहन चालवत होते, तर ३४७ वाहनचालक मोबाईलवर बोलताना आढळले. यापूर्वी ३ जुलै रोजी २६,९५४ नियमभंगाच्या घटना नोंदविण्यात आल्या होत्या.
राज्यात सध्या २६ ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्यात आले असून, सप्टेंबरपर्यंत ही संख्या ५२ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर राज्यातील ९२ ठिकाणी एआय कॅमेरे कार्यरत असतील. सध्या एआय कॅमेऱ्यांद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नियमभंग झाल्यास संबंधित वाहनचालकाला केवळ संदेश पाठविला जात आहे. मात्र, १५ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू होईल, असे मंत्री माॅविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
महिंद्रा थारच्या रेंटल परवान्यांवर निर्बंधांची शक्यता
रेंट-अ-कार वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा थार वाहनांना रेंटल परवाने देण्यावर बंदी किंवा निर्बंध घालण्याचा प्रस्ताव राज्य वाहतूक प्राधिकरणासमोर ठेवण्यात येणार आहे. लवकरच प्राधिकरणाची बैठक होणार असून, त्यात रेंट-अ-कार वाहनांचे ऑडिट करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, असे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.