हनीट्रॅप करणाऱ्या संशयित अक्षताचा पोलिसांसमोर कबुलीजबाब

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : उडुपी, कर्नाटक येथील जलक्रीडा व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२, रा. मालपे उडुपी) यांना मी झोपेच्या गोळ्या दिल्या. हे खर आहे; परंतु त्या चुकून दिल्या. मी त्या माझ्यासाठी आणल्या होत्या, असा जबाब संशयित अक्षता एम. के. उर्फ रूपश्री सी. (३५, रा. नंथूर मंगळूरू) हिने दिला असून एकप्रकारे खुनाची कबुलीच दिली आहे. संदीप यांच्या खून प्रकरणी संशयित अक्षताला कळंगुट पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.
हा खुनाचा प्रकार ३० जून रोजी उघडकीस आला होता. संदीप सुवर्णा हा फाल्कन रिसॉर्टमध्ये मृतावस्थेत सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी १ जुलै रोजी भा. न्या. सं.चे कलम १२३, ३०९ व १०३(१) संशयित महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ३ रोजी संशयित अक्षताला बंगळुरूमधून पोलिसांनी अटक केली होती. ‘मी झोपेच्या गोळ्या माझ्यासाठी आणल्या होत्या. गोळ्या घेण्यासाठी त्या ग्लासमधील पेयामध्ये टाकल्या. गप्पा गोष्टी करताना तो ग्लास चुकून सुवर्णाला दिला. त्याने पेय पिले व तो झोपी गेला. त्यानंतर मी घाबरले व त्याची सोनसाखळी घेऊन तिथून निघून गेले, असा कबुलीजबाब अक्षताने दिला आहे.
संशयित अक्षता खोटे बोलते : पोलिसांचा दावा
संशयित अक्षता एमबीए पदवीधर आहे. साडी ड्रेपिंग एक्स्पर्ट असल्याचेही ती सांगत आहे. श्रीमंतांना जाळ्यात ओढून, हनीट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याच्या प्रकरणात तिचा हातखंडा आहे. हीच तिची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. तिचा वरील जबाब हा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न आहे. हा जबाब घटनेशी जुळत नसून ती खोटे बोलत आहे, असा दावा पोलिसांचा आहे.