मॅरेथॉन बैठकांनंतरही धुसफूस कायम : सुनील कवठणकर कार्याध्यक्ष; वासिम खान निलंबित

चिखली येथील शेतात शेतकऱ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेताना काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल. सोबत माणिकराव ठाकरे, विरियातो फर्नांडिस, युरी आलेमाव व इतर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गिरीश चोडणकर यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षात निर्माण झालेल्या असंतोषाचे पडसाद काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या बैठकीत उमटले. पक्षातील अंतर्गत धुसफूस आणि ‘गोवा काँग्रेस पार्टी’ स्थापन करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसश्रेष्ठींनी डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील कवठणकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर वेणुगोपाल यांच्यासमोर पक्षावर उघडपणे टीका करणारे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वासिम खान यांना पदावरून निलंबित करण्यात आले.
काँग्रेस पक्ष एकसंघ असून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. रविवारी दुपारी ते दिल्लीकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी चिखली येथे शेतकऱ्यांसोबत भोजन केले. यावेळी प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव व इतर उपस्थित होते.
आमदार, खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी वेणुगोपाल यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन त्यांनी पक्षबांधणीवर भर देण्याचा सल्ला दिला. काहींनी नाराजी व्यक्त केली असली, तरी पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ‘गोवा काँग्रेस पार्टी’ स्थापन करण्यासंदर्भातील नोटीसही जारी झाली. हा पक्ष स्थापन झाल्यास काँग्रेसमधील नाराज नेते त्यात सहभागी होण्याची चर्चा सुरू आहे. या नव्या पक्षामागे भाजपचा हात असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला असला, तरी काँग्रेसमधील नाराज गटाकडूनच हा पक्ष स्थापन होत असल्याची चर्चा सुरू आहे. गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीमुळे दुखावलेल्या काही नेत्यांचा या नव्या पक्षामागे हात असल्याचा आरोप फादर एरमितो रिबेलो यांनी केला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी के. सी. वेणुगोपाल गोव्यात दाखल झाले आणि शनिवारी दिवसभर विविध बैठकांचे सत्र पार पडले. अमित पाटकर यांची हकालपट्टी झाल्याने नाराज झालेल्या मनीषा उसगावकर तसेच अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. पक्षात शिस्त अत्यंत महत्त्वाची असून, शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. ते दिल्लीला रवाना होताच अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वासिम खान यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.
महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप, जोएल आंद्राद तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी वेणुगोपाल यांची भेट घेतली. पणजी मतदारसंघातील राजकारण आणि पक्ष संघटनेबाबत चर्चा झाल्याची माहिती जोएल आंद्राद यांनी दिली. महिला काँग्रेस, युवा काँग्रेस आणि एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांशीही वेणुगोपाल यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत एनएसयूआयची भूमिका महत्त्वाची असून, संघटना अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती एनएसयूआयचे सरचिटणीस नौशाद चौधरी यांनी दिली.
सुनील कवठणकर यांना कार्याध्यक्षपद
सुनील कवठणकर यांनी यापूर्वी पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. संघटनेत सक्रिय असूनही त्यांना योग्य स्थान मिळाले नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यांनी कधीही उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशीही के. सी. वेणुगोपाल यांनी दीर्घ चर्चा केली.
अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षांवर कारवाई
‘काँग्रेस पक्ष अल्पसंख्याकांचा केवळ वापर करतो, मात्र त्यांना योग्य सन्मान देत नाही. अल्पसंख्याकांसाठी काँग्रेस काहीच करत नाही’, असा आरोप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वासिम खान यांनी जाहीरपणे केला होता. अल्पसंख्याकांसह स्वतःवरही पक्षाकडून अन्याय झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आले. पक्षाने अल्पसंख्याक विभाग बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून, नझीर खान यांची विभागाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
‘गोवा काँग्रेस पार्टी’चा परिणाम होणार नाही : गिरीश चोडणकर
काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष असून अंतर्गत मतभेद असणे स्वाभाविक आहे. सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्यासमोर आपली मते मांडली. आगामी विधानसभा निवडणूक आणि पक्ष संघटनेबाबत सविस्तर चर्चा झाली. यानंतर संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे पुढे नेले जाईल. ‘गोवा काँग्रेस पार्टी’चा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
पक्षात गटबाजी नाही; बहुमताने सत्ता मिळवू : वेणुगोपाल
दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यात आमदार, खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला.
उमेदवारीसाठी इच्छुकांनी घेतल्या भेटी
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्यांनी के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. ताळगाव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी दत्तप्रसाद नाईक इच्छुक आहेत. मागील दोन निवडणुकांत ते भाजपचे उमेदवार होते. सध्या त्यांनी ताळगाव मतदारसंघात सक्रिय काम सुरू केले असून, वेणुगोपाल यांची भेट घेऊन त्यांनी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.
मतविभाजन टाळण्यासाठी युतीची आवश्यकता
मी आम आदमी पक्षात होतो, तेव्हा मतविभाजन टाळण्यासाठी युतीची मागणी करत होतो. त्यावेळी ‘आप’ नेतृत्वाने माझ्या मागणीकडे लक्ष दिले नव्हते. लोकसभा निवडणुकीत युतीमुळे दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडिस विजयी होऊ शकले. तेव्हासुद्धा ‘आप’तर्फे मी युतीसाठी प्रयत्न केले होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची युती झाली नाही. याचा परिणाम होऊन काही मतदारसंघांत मतविभाजन होऊन भाजपचे उमेदवार विजयी झाले. आताच युतीबाबत ‘आप’ नेतृत्वाचे मतपरिवर्तन कसे झाले, असा प्रश्न अॅड. अमीत पालेकर यांनी केला आहे. भाजपविरोधात समविचारी पक्षांची युती होणे आवश्यक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही स्पष्ट केले आहे. भाजपविरोधी पक्षांची युती होणे आवश्यक आहे, असे अॅड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी अॅड. अमित पालेकर ‘आप’चे गोव्याचे समन्वयक होते.