मुरगाव पोलिसांची कारवाई : दोन दिवसांची पोलीस कोठडी

वास्को : गहाण ठेवलेले दागिने परत करण्यास टाळाटाळ करून अनेक महिलांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला सराफ भीमाप्पा चलवादी याला मुरगाव पोलिसांनी कर्नाटकातील होस्पेट येथून अटक केली. त्याला वास्को प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सडा भागातील पीबीसी ज्वेलर्स या दुकानातून चलवादीने कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनेक महिलांकडून दागिने गहाण ठेवून घेतल्याचा आरोप आहे. काही महिलांनी कर्ज व व्याजाची रक्कम पूर्ण फेडल्यानंतरही त्याने दागिने परत करण्यास टाळाटाळ केली. काही प्रकरणांत उर्वरित रक्कम भरण्याची तयारी दाखवूनही चलवादीने पैसे स्वीकारण्यास नकार दिला, असा महिलांचा दावा आहे.
सुरुवातीला एका महिलेने मुरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आणखी दोन महिलांनी तक्रारी दिल्या. तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून चलवादीचा शोध घेतला आणि होस्पेट येथे त्याला अटक केली. दरम्यान, काही पीडित महिलांनी चलवादीच्या जामीन अर्जाला विरोध करत हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. जामीन अर्ज आणि हस्तक्षेप याचिकेवरील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे.
बनावट सह्यांचाही आरोप
काही महिलांनी आरोप केला की, त्यांनी कर्जाची रक्कम पूर्णपणे फेडण्याची तयारी दर्शवूनही चलवादीने पैसे स्वीकारण्यास नकार दिला. तसेच दागिने वितळविल्याचे सांगितले. महिलांनी नियम व अटींच्या अर्जावर केलेल्या सह्या बनावट असल्याचाही गंभीर आरोप पीडितांकडून करण्यात आला आहे.