वागातोरच्या रहिवाशाने ईमेलद्वारे मांडली व्यथा : प्रशासन लक्ष देत नसल्याचा दावा

म्हापसा : ओझरान-वागातोर परिसरातील नाईटक्लबमधून रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या एका रहिवाशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ईमेलद्वारे भावनिक साकडे घालत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये नोएल डिसोझा यांनी म्हटले आहे की, हजारो पर्यटकांना आकर्षित करणारी वागातोरची ‘नाईटलाईफ’ स्थानिक रहिवाशांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. मध्यरात्रीनंतरही नाईटक्लबमधून येणारे मोठ्या आवाजातील संगीत, तीव्र ‘बास’ आणि त्यामुळे निर्माण होणारी कंपने यामुळे झोपेचा गंभीर व्यत्यय येत असून आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
रात्री १० नंतर मोठ्या आवाजातील संगीतावर बंदी असतानाही अनेक नाईटक्लब पहाटेपर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करत असल्याचा आरोप करत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल डिसोझा यांनी उपस्थित केला आहे. तसेच ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी आणि रात्रीची गस्त वाढविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करताना डिसोझा यांनी नवजात बालके, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच रात्रभर झोप न झाल्याने त्रस्त नोकरदार वर्गाच्या आरोग्याचा आणि दैनंदिन जीवनाचा प्रश्न यामध्ये गुंतलेला असल्याचे ईमेलमध्ये नमूद केले आहे.
तक्रारींनंतरही कारवाईचा अभाव
डिसोझा यांनी पोलीस नियंत्रण कक्ष, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीकडे अनेकदा तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्येक वेळी केवळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.