श्रीमद्भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायाची सुरुवात करताना अर्जुन श्रीकृष्ण चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. 'माऊलींच्या' दिव्य ओव्यांच्या प्रकाशात, मोहाचा अंधार नष्ट होऊन अर्जुनाला आत्मज्ञानाची प्राप्ती कशी झाली, याचा हा भावपूर्ण आणि रसाळ प्राकृत विस्तार.

मागील लेखात आपण ज्ञानदेव माऊलींनी केलेला श्रीमद्भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या नमनाचा भावपूर्ण विस्तार बघितला. आता प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करुया.
अर्जुन उवाच -
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम्।
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोयं विगतो मम।।१।।
सरळ अर्थ : अशी ही भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, "हे भगवंता, माझ्यावर अनुग्रह करण्यास्तव परम गुह्य अध्यात्म विषयक वचन म्हणजे उपदेश आपणाकडून जो सांगितला गेला, त्यायोगे माझे हे अज्ञान नाहीसे झाले आहे."
विस्तृत विवेचन : तेव्हा कुंतीपुत्र पार्थ श्रीकृष्णांना म्हणाला की, "तुम्ही माझ्यासाठी बोलापलिकडील म्हणजे शब्दातीत गोष्टी प्रकट केल्या आहेत."
"जेव्हा जीव, महत्त्व इत्यादी गोष्टी नाहीशा होतात आणि पंचमहाभूते अव्यक्तांत आटतात. (अव्यक्त म्हणजे स्पष्टत्वास न आलेले. निर्गुण ब्रह्म किंवा मूळ प्रकृती. जेव्हा हा शब्द मूळ प्रकृती या अर्थाने वापरला जातो तेव्हा त्रिगुणांची समतोलावस्था असा त्याचा अर्थ असतो.) "हे देवा जेव्हा तुम्ही ज्या स्वरूपात राहता, तो तुमचा अंतिम असा विश्रांतीचा ठाव असतो, होय ना? हे जे तुम्ही एखाद्या कृपणाप्रमाणे आपल्या निज-अंतःकरणात राखून शब्दब्रह्मापासूनही लपवून ठेवले होते, तेच अंतरीचे गुज आज तुम्ही माझ्यासमोर मोकळे केले आहेत. ज्या आत्मज्ञानासाठी नीळकंठ महादेव शंकराने या जीवनाच्या गोजिरवाण्या ऐश्वर्यावर तुळशीपत्र ठेवून स्मशानाची भयाण शांतता व विभूती पत्करली तीच (आत्मज्ञानाची) गोमटी वस्तू तुम्ही आज एकाएकी माझ्यासमोर प्रकट केली आहे. हे सगळे तसे ग्राह्य धरले, तर आम्ही काय तुमच्याहून अंतर्यामी भिन्न आहोत का?"
"खरे तर नाही, पण तरीही मी माया-मोहाच्या महापुरात पार बुडून गेलो होतो. पण तेवढ्यात हे श्रीहरी, तू आज उडी घालून आता मला त्यातून बाहेर काढले आहेस. या संपूर्ण विश्वात तूच एक आहेस आणि तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही हेच सत्य होय."
पण, आमचे संचितच विपरीत! (संचित म्हणजे दैव. पूर्वजन्मींचे कर्मसंस्कार. पूर्वजन्मींच्या ज्या कर्मांचा परिणाम म्हणून सांप्रत देह व सांप्रत परिस्थिती प्राप्त झाली, तो सांप्रत देह आणि तो कर्मांचा समुदाय यालाच सामान्य भाषेत 'दैव' म्हटले जाते.
प्राक्तन, पूर्वकर्म किंवा संचित म्हणजे "साठवलेले." अनेक जन्मांतील कर्मांच्या संस्काराचा असा साठा की ज्यातून पुनः पुनः निरनिराळ्या वासना उद्भवून हातून अनेक कर्में घडणे, त्यातून अनेक फळे व अनेक संस्कार निर्माण होणे असे कर्मचक्र चालते.
क्रियमाण म्हणजे चालू क्रिया. चालू जन्मात जी बरीवाईट कर्मे काया-वाचा-मनाने होत असतात ती व त्यांचे परिणाम आणि संस्कार.
प्रारब्ध, संचित व क्रियमाण या तीन प्रकारच्या कर्मबंधनांनी प्रत्येक जीव बांधलेला आहे. कर्मयोगाने म्हणजे कर्तेपणाचा अभिमान आणि फलाची हाव सोडून कर्म केल्याने क्रियमाणाच्या बंधनातून, ईश्वर चिंतनात - भोगून - शांतपणे सहन करून प्रारब्धातून आणि ईश्वर-स्वरूपात-आत्म-स्वरूपात-विलीन होऊन संचितांतून म्हणजे सर्वच कर्मबंधनातून सुटायचे असते.
अर्जुन म्हणतोय की, आमचे संचित असे विपरीत आहे की आम्ही अहंकाराने कसे भ्रांत झालो आहोत बघ. या जगात हा मी एक अर्जुन असा आहे, जो देहाचा अभिमान वाहत आहे आणि या देहाभिमानायोगे कौरवांना स्व-जन मानून त्यांच्याबरोबर युद्धच करायला नको असे म्हणत होतो! हे माझे आप्त-जन आहेत, आणि यांना जर युद्धांत ठार मारले तर गहन दुर्गतीस मी प्राप्त होईन अशा प्रकारचे दुष्ट स्वप्न मी पाहत होतो! पण तेवढ्यातच तू मला जागे केलेस. हे श्रीपती, केवळ तुझ्यामुळे ती गंधर्वनगरीची वस्ती सोडून मला बाहेर निघता आले (इथे गंधर्वनगर म्हणजे काल्पनिक अथवा मिथ्या गोष्ट. आकाशातील ढगांच्या आकृतींवर होणारा नगरादिकांचा भास; हवेत प्रकाशकिरणांच्या वक्र गतीने उत्पन्न झालेला भूलोकावरील शहरे, बागा इत्यादि पदार्थांचा देखावा). तहान भागावी म्हणून मी मृगजळ प्रशान करण्याच्या प्रयत्नात होतो (अती उन्हाने माळजमीन किंवा वाळवंट सडकून तापले म्हणजे त्या लगतच्या हवेचे थरही तापून हलके होतात. ते वर जाऊ लागले म्हणजे हवा-पाण्याचा आभास निर्माण होतो. त्या पाण्याच्या आभासाला मृगजळ म्हणतात. ते पाणीच आहे असे समजून तृषापीडित हरणे भुलून तिकडे वेगाने धाव घेतात).
या देहाभिमानाच्या अहंकारापायी मी सर्पाला दोरी समजून बसलो होतो. खरोखरच त्या अहंकाररूपी विषाच्या भयंकर लहरी मला जाणवत होत्या. (इथे लहरी म्हणजे विषारी पदार्थ किंवा विषारी दंश, क्रोध, काम, इत्यादिकांपासून मरणकाळी शरीरात उठणारे वेग किंवा झटके; झटक्यांच्या लाटा.) आणि त्या योगे मी फुकाफुकी मरणाला कवटाळायला लागलो होतो. पण हे दयासागरा श्रीकृष्णा तूच मला त्यातून वाचवले आहेस. एखाद्या विहिरीतील पाण्यातील आपल्याच प्रतिबिंबाला दुसरा सिंह समजून उडी घ्यायला जाणाऱ्या सिंहाला कुणीतरी धरून ठेवून वाचवावे तसे आज देवा तुम्ही मला वाचवलेत. नाहीतर हे अनंता, एरवी मी तसाच निर्धार केला होता! सातही समुद्र एक होऊन त्यात जग जरी बुडाले आणि वरून हे आकाशही कोसळले, तरी आपल्याच गोत्रजांशी आपल्याच कुळांतील मंडळींशी हा रणसंग्राम नको, अशा अहंकाराने ओढला जाऊन त्या दुराग्रहात मी बुडून गेलो होतो. नशिबाने हे श्रीहरी तेव्हा तू माझ्या सन्निध होतास म्हणून मला बुडत्याला बाहेर काढले आहे.
"खरेच देवा, तुमचे हे शब्द म्हणजे निव्वळ उपदेश नसून माझ्या मोहाचा नाश करणारे दिव्य अमृतच आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवताच अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुमच्या या परम गुह्य अध्यात्मज्ञानाने माझ्या मनातील संभ्रम पार गळून पडला आहे. आता मी पूर्णपणे तुमच्या चरणी शरणागत झालो असून, माझे अज्ञान समूळ नष्ट झाले आहे." (क्रमशः)
- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.), मो. ९४२३८८९७६३