
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर नराधम भीमराव कांबळे याने अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने सारा देश हळहळला. ही बातमी काही तासांत सर्वदूर पोहोचली आणि जनक्षोभ उसळला. जनक्षोभामुळे कासवगतीने हलणारी यंत्रणा वेगाने कार्यरत झाली. त्यामुळे १ मे रोजी दुपारी हे अमानवी कृत्य झाल्यानंतर फक्त ५८ दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यानंतर कमी वेळात तपास आणि न्यायप्रक्रिया पूर्ण होण्याचा हा विक्रमच आहे.
गुन्हा १ मे रोजी घडल्यानंतर अवघ्या दीड तासात पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळेला गजाआड केले. त्यानंतर काही दिवसांतच आरोपपत्र दाखल झाले. जलदगती न्यायालयात झालेल्या सुनावणीत साक्षीदार तपासणे, बचाव आणि सरकारी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद आदी प्रक्रियाही वेगाने झाल्या. न्यायालयाने २५ जून रोजी, म्हणजे घटनेनंतर ५५ दिवसांतच आरोपी दोषी असल्याचे जाहीर केले आणि त्याला २९ जून रोजी शिक्षा सुनावली. वेगाने झालेला तपास आणि नराधमाला सुनावलेली फाशीची शिक्षा, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपण काय करणार आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
अशा विकृती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. काही व्यक्तींमध्ये वाढलेली विकृत लैंगिक मानसिकता, महिला आणि मुलांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन, संस्कारहीनता, अश्लील आणि बेजबाबदार डिजिटल सामग्रीचा गैरवापर, तसेच गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची सामाजिक प्रवृत्ती ही काही कारणे आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे, अनेकदा अशा घटना घडून गेल्यानंतरच आपण जागे होतो. मुलांना सुरक्षित वातावरण देणे, त्यांना योग्य-अयोग्य स्पर्शाची जाणीव करून देणे, त्यांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकणे आणि संशयास्पद वर्तनाकडे दुर्लक्ष न करणे, ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. मुलांशी संवाद वाढवणे, मायेचा ओलावा ठेवताना कुटुंब आणि समाजाचे संरक्षक कवच तयार करणे, हा अशा घटनांना रोखण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.
गुन्हा करणारा दोषी असतोच; मात्र समाजानेही सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कायदे कडक आहेत; पण त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. कायद्याचा धाक न उरल्याने समाजात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. तसेच गुन्हेगारांचे धारिष्ट्य वाढले, हेही तितकेच सत्य आहे. अशा प्रकरणांमध्ये जलद तपास, जलद न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा, यामुळे गुन्हेगारांना धाक निर्माण होऊ शकतो. केवळ शिक्षेच्या भीतीवर समाज सुरक्षित होणार नाही. त्यासाठी घर, शाळा आणि समाज या तिन्ही स्तरांवर जबाबदारीची भावना निर्माण करावी लागेल. मुलांचे बालपण सुरक्षित ठेवणे ही समाजाचीही जबाबदारी आहे.
- प्रदीप जोशी