Home >> विचार >> काँग्रेसची राजकीय घसरण थांबेल का ?

काँग्रेसची राजकीय घसरण थांबेल का ?

निवडणुकीनंतर काँग्रेसचे राजकारण अनेकदा जनतेच्या प्रश्नांपेक्षा अंतर्गत कलहाभोवतीच फिरताना दिसले. हीच तिची सर्वात मोठी शोकांतिका ठरली. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीनंतर निर्माण झालेली धुसफूस हा त्याच समस्येचा पुढचा अध्याय आहे.

Story: संपादकीय |
05th July, 11:28 pm
काँग्रेसची राजकीय घसरण थांबेल का ?

गोव्यातील काँग्रेस पुन्हा एकदा निर्णायक वळणावर उभी आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेत काही प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र दिसत असले, तरी त्या नाराजीचे मतांमध्ये रूपांतर करून घेण्याची क्षमता काँग्रेसकडे आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण काँग्रेसचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी भाजप नसून, पक्षातील गटबाजी, अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वावरील अविश्वास आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये ऐक्य होईल का, हा प्रश्न केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून, गोव्यातील लोकशाहीच्या भवितव्याशी जोडलेला आहे. गेल्या दशकात काँग्रेसचे जितके नुकसान विरोधकांनी केले नाही, त्यापेक्षा अधिक नुकसान तिने स्वतःच्या हाताने करून घेतले. मतदारांनी सत्ता दिली, विरोधी पक्ष म्हणून बळ दिले, आमदार निवडून दिले; पण पक्षांतर, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, नेतृत्वातील कमतरता आणि संघटनात्मक विस्कळीतपणा यामुळे जनतेचा विश्वास ढासळला. निवडणुकीनंतर काँग्रेसचे राजकारण अनेकदा जनतेच्या प्रश्नांपेक्षा अंतर्गत कलहाभोवतीच फिरताना दिसले. हीच तिची सर्वात मोठी शोकांतिका ठरली. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीनंतर निर्माण झालेली धुसफूस हा त्याच समस्येचा पुढचा अध्याय आहे. कोणत्याही पक्षात मतभेद असू शकतात; परंतु ते संवादाने मिटविण्याऐवजी बंडखोरीत परिवर्तित झाले, तर संघटना कमकुवत होते. नेतृत्वाची खरी कसोटी सर्वांना खूश ठेवण्यात नसते, तर मतभेदांना पक्षहिताच्या चौकटीत सामावून घेण्यात असते. दुर्दैवाने, गोवा काँग्रेसमध्ये ही परिपक्वता वारंवार कमी पडताना दिसते. याच कारणास्तव दिल्लीहून प्रथमच संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना गोव्यात धाव घ्यावी लागली. त्यांच्या भेटीनंतर सारे काही आलबेल आहे असे मानण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षाच्या पद्धतीनुसार अखेरच्या क्षणी म्हणजे वेळ निघून गेल्यावर निस्तरण्यासाठी हालचाल केली जाते.

आज काँग्रेसपुढे दोनच मार्ग आहेत. पहिला म्हणजे जुन्याच गटबाजीच्या दलदलीत अडकून स्वतःचे अस्तित्व अधिक कमकुवत करणे आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर एकसंध संघर्ष उभारणे. महागाई, बेरोजगारी, पर्यावरण, खाण व्यवसाय, पर्यटन, जलसंकट, शिक्षण, भाषा, गोमंतकीय अस्मिता आणि अनियंत्रित विकास यांसारख्या असंख्य प्रश्नांनी गोवा वेढलेला आहे. या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून सातत्याने लढणारा सक्षम विरोधी पक्ष जनतेला हवा आहे. काँग्रेसने एक कटू वास्तव स्वीकारले पाहिजे, ते म्हणजे तिच्या प्रत्येक अंतर्गत संघर्षाचा राजकीय लाभ सत्ताधारी पक्षालाच होतो. विरोधी मतांचे विभाजन म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी सर्वात मोठी ताकद. त्यामुळे काँग्रेसमधील प्रत्येक नेत्याने स्वतःला एकच प्रश्न विचारला पाहिजे की, 'आपण पक्ष उभारत आहोत की विरोधकांना अधिक बळ देत आहोत?' पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी केवळ चेहरे बदलून उपयोग होणार नाही. कार्यकर्त्यांचा सन्मान, निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, तरुण नेतृत्वाला संधी, ज्येष्ठांचा अनुभव, मजबूत बूथ संघटना आणि वर्षभर जनतेमध्ये राहून संघर्ष करण्याची तयारी या गोष्टी अपरिहार्य आहेत. निवडणूक जवळ आली की जनतेसमोर जाण्याची जुनी पद्धत आता चालणार नाही. विश्वास हा भाषणांनी नव्हे, तर सातत्यपूर्ण कृतीतून मिळतो.

गोव्याची जनता आजही सक्षम, विश्वासार्ह आणि जबाबदार विरोधी पक्षाच्या प्रतीक्षेत आहे. लोकशाहीत सत्तेइतकाच सक्षम विरोधी पक्षही आवश्यक असतो. मात्र त्यासाठी काँग्रेसने आधी स्वतःच्या घरातील विस्कळीतपणा दूर करावा लागेल. ऐक्य, शिस्त आणि जनतेशी सातत्यपूर्ण नाळ जोडली, तर पुनरुज्जीवनाची संधी अजूनही संपलेली नाही. पण गटबाजी, अहंकार आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांनाच प्राधान्य दिले, तर इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करेल. गोव्यातील काँग्रेसची खरी लढाई आज भाजपशी नाही; ती स्वतःच्या कमकुवतपणाशी आहे. स्वतःला सावरल्याशिवाय विरोधकांना आव्हान देता येत नाही. ऐक्य, संघटनशक्ती आणि जनतेच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण संघर्ष हेच काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे तीन आधारस्तंभ आहेत. अन्यथा दशा बदलण्याची प्रत्येक संधी दिशाहीन राजकारणाच्या भोवऱ्यात हरवत राहील. गोवा काँग्रेसने आता आत्मपरीक्षणावर न थांबता कृतीची दिशा स्वीकारली पाहिजे. कारण लोकशाहीत जनता आश्वासनांवर नव्हे, तर परिणामांवर विश्वास ठेवते.  काँग्रेसने प्रथम स्वतःला सावरणे गरजेचे आहे. अंतर्गत संघर्ष संपला, तर पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते; पण अहंकार, गटबाजी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा कायम राहिल्या, तर पक्षाची राजकीय घसरण थांबणे कठीण आहे.