हल्ल्यात पती, पत्नी जखमी : संशयिताला अवघ्या अर्ध्या तासात अटक

वास्को : कासावली येथील मडालेम भागात शनिवारी कौटुंबिक वादाचे हिंसक रूप धारण झाल्याने एका व्यक्तीने पती-पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पतीच्या मानेवर गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीही जखमी झाली.
वेर्णा पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आकाश कुमार हा पीडित कुटुंबाचा नातेवाईक असून, तो शनिवारी सकाळी ११च्या सुमारास चाकू घेऊन जितेंद्र कुमार जैस्वाल (३५) यांच्या भाड्याच्या घरी आला होता. स्वतःच्या हाताची नस कापण्याची धमकी देत त्याने गोंधळ घातला. जितेंद्र यांनी त्याला शांत करण्याचा आणि घराबाहेर जाण्यास सांगितले असता आरोपीने संतापून त्यांच्या मानेवर चाकूने वार केला. गोंधळ ऐकून जितेंद्र यांची पत्नी प्रियांका जैस्वाल (३०) धावून आली. पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात झटापटीदरम्यान तिच्या हाताला चाकूची जखम झाली. आरोपीने तिला ढकलून दिल्याने तिच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी आरोपीचा फोटो मिळवून शोधमोहीम सुरू केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला अटक करण्यात आली. प्रियांका जैस्वाल यांच्या तक्रारीवरून वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ आणि ११८(१) अन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी
अटक केलेल्या आरोपीला जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोमकर हे पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.