
गोव्याची ओळख आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच पर्यटनासाठी एक शांत आणि सुरक्षित राज्य म्हणून नावलौकिक लाभला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर वाढत्या गुन्हेगारीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर त्याचा थेट फटका पर्यटन व्यवसायाला बसेल. त्यामुळे सरकारने केवळ गुन्हे घडल्यानंतर छडा लावण्यावर भर देताना, गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबर शेजारच्या राज्यांसह केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधून कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
राज्यात खून, दरोडे, अमली पदार्थांची तस्करी, जमीन घोटाळे, टोळी युद्ध आणि महिला, मुलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय राज्यात अमली पदार्थांचा वाढता प्रसार आणि संघटित गुन्हेगारीने कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यामुळे राज्याची शांत आणि सुरक्षित राज्य ही ओळख आता धोक्यात आली आहे. गुन्हेगारी कारवाईची जाळे केवळ किनारी भागापुरते मर्यादित न राहता आता ग्रामीण भागात आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचले आहे.
उत्तर गोव्यात कळंगुट, हणजूण, मांद्रे, पर्वरी, पणजी, आगशी, जुने गोवा, तर दक्षिण गोव्यात फातोर्डा या पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या भागात खून, टोळीयुद्ध, खंडणी, प्राणघातक हल्ले आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राज्यात नुकत्याच घडलेल्या काही गुन्हेगारी घटनांमध्ये सराईत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. तसेच जाहीरपणे विरोधी टोळ्यांवर आणि स्थानिक नागरिकांवर हल्ले केले आहेत. अशा घटनांमुळे शांतताप्रिय राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याची प्रतिमा डागाळत चालली आहे. याची दखल घेऊन विरोधी पक्षांनी थेट राज्यपालांकडे धाव घेत राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला आहे.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी गृह खाते आणि गोवा पोलिसांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय करण्याची आवश्यकता आहे.
राज्यात जे गुन्हेगार वारंवार गुन्हे करत आहेत, अशा सराईत गुन्हेगारांवर तत्काळ तडीपार करण्याची कारवाई पुन्हा सुरू करावी, याशिवाय राज्यात 'रासुका'ची अंमलबजावणी करून कडक कारवाई करणे गरजेचे आहे. कळंगुट, हणजूण व इतर किनारी तसेच राज्यातील संवेदनशील भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवली पाहिजे, तसेच नाकाबंदी घालून तपासणी करण्याची आवश्यकता आहे. संशयास्पद ठिकाणांवर अचानक छापे मारून गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. ड्रग्ज तस्करीचे उच्चाटन करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हा शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी अधिक आक्रमकपणे काम केले पाहिजे. त्यासाठी शेजारच्या राज्यांसह केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधणे महत्त्वाचे आहे. गुन्हे घडल्यानंतर अटक करून कारवाई करण्यापेक्षा गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनात अंतर्गत सुधारणा करणे गरजेचे आहे. पोलीस स्थानकांमधील अंतर्गत गुप्तचर यंत्रणा मजबूत करून गुन्हेगारांच्या हालचालींवर आधीच लक्ष ठेवले पाहिजे. तसेच, वाढत्या गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी, पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तांत्रिक प्रशिक्षण देणे, तसेच राजकीय नेत्यांनी पोलीस यंत्रणेत वशिलेबाजी आणि हस्तक्षेप करणे टाळावे, ही काळाची गरज आहे.
- प्रसाद शेट काणकोणकर