Home >> गुन्हे >> संदीप सुवर्णाच्या व्हिसेरा अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

संदीप सुवर्णाच्या व्हिसेरा अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

शवचिकित्सेत कारण अस्पष्ट : मृत्यूचे कारण लवकरच येणार उघडकीस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th July, 11:33 pm
संदीप सुवर्णाच्या व्हिसेरा अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

म्हापसा : कळंगुट येथे उडुपीतील जलक्रीडा व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२, रा. मालपे कर्नाटक) याच्या मृत्यूचे कारण शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता पोलिसांनी व्हिसेरा फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला असून, या अहवालातून संदीपचा मृत्यू हा झोपेच्या गोळ्यांमुळेच की अजून कोणत्या गुंगीच्या औषधामुळे झाला आहे, हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
संदीपचा मृत्यू कशापद्धतीने झाला हे डॉक्टरांनी स्पष्ट केले नसल्याने या प्रकरणात गुढ निर्माण झाले होते. तसेच या खून प्रकरणात अटक केलेल्या ३५ वर्षीय महिला संशयित आरोपी अक्षता एम. के. उर्फ रूपश्री सी. (रा. नंथूर मंगळुरू) हिने आपण संदीप सुवर्णा याला चुकून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या, असा कबुलीजबाब दिला आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या दृष्टीने संदीप सुवर्णा याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणे गरजेचे आहे. त्याचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांमुळेच झाला की संशयित महिलेने त्याला अजून काही पाजले होते का, याचा उलगडा या प्रकरणाच्या तपासासाठी कळंगुट पोलिसांसाठी आवश्यक आहे. कारण संशयित महिलेने दिलेल्या कबुलीजबाबावर पोलिसांना शंका आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अक्षता हिने चौकशीवेळी या खुनाची कबुली दिली आहे. तिने स्वत:साठी झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या. त्या पेयामध्ये मिसळल्या होत्या. परंतु गप्पा मारण्याच्या ओघात चुकून तो ग्लास संदीप सुवर्णा यांच्या हातात गेला. ते पेय प्यायल्यानंतर संदीप बेशुद्ध झाला, हे पाहून ती घाबरली आणि तिने मृताच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून पलायन केले. पोलिसांनी जेव्हा आपल्याला बंगळुरू न्यायालयात ट्रांझिट रिमांडसाठी हजर केले. तेव्हा संदीपचा मृत्यू झाल्याचे समजल्याचे तिने सांगितले आहे.
दरम्यान, संदीपचा भाऊ चेतन सुवर्णा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दि. १ जुलै रोजी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी कळंगुट पोलिसांनी संशयित अक्षता एम. के. उर्फ रूपश्री सी. हिला बंगळुरूमध्ये अटक केली होती.

मृत्यूचे गूढ कायम
३० जून रोजी कळंगुटमधील फाल्टन रिसॉर्टमध्ये संदीप सुवर्णा यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या सापडला होता. दुसऱ्या दिवशी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवचिकित्सा करण्यात आली. परंतु, डॉक्टरांनी मृत्यूचे कारण राखून ठेवल्याने गुंतागुंत वाढली आहे. संशयित महिलेने संदीप यांना नक्की काय पाजले होते, हे सिद्ध करण्यासाठी आता व्हिसेरा अहवाल हाच पोलिसांच्या तपासातील मुख्य दुवा ठरणार आहे.    

हेही वाचा
सर्व पहा