Home >> ताज्या बातम्या >> महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणेंची म्हापसा न्यायालयात हजेरी

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणेंची म्हापसा न्यायालयात हजेरी

धारगळमधील प्रवेश शुल्क बूथची मोडतोड प्रकरण


3 hours ago
महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणेंची म्हापसा न्यायालयात हजेरी

गोवन वार्ता प्रतिनिधी
म्हापसा : धारगळ, पेडणे येथील प्रवेश शुल्क बूथची मोडतोड आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा कणकवलीचे आमदार नितेश राणे सोमवारी म्हापसा न्यायालयात हजर झाले. न्यायालयात अनुपस्थित राहत असल्यामुळे गेल्या शनिवारी त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
सोमवारी नितेश राणे म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले. न्यायालयाने त्यांचा वरील खटल्यात अधिकृत जबाब नोंदवून घेतला व या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलैपर्यत पुढे ढकलली. नितेश राणे यांचे वकील अॅड. अभय चिखलीकर यांनी पत्रकारांना सांगितले की, आपले अशील नितेश राणे यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले आहे. ते स्वत: सुनावणीसाठी हजर राहिले आहेत. ४ जुलै रोजी महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट’ असल्याने, तसेच काही कारणास्तव ते गोव्यात पोहोचू शकले नव्हते.
बूथ मोडतोडप्रकरणी पेडणे पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण व सार्वजनिक मालमत्तेची नासधूस यासह इतर आरोपांखाली गुन्हा नोंद केला होता. नितेश राणे यांच्यासह राहुल परब, मुकुंद परब, हरिश्चंद्र परब, राकेश परब, प्रशांत मळकर, विनम्र आचरेकर, सागर पाटील व संतोष राऊत यांना अटक केली होती. पोलिसांनी आरोपपत्र सादर केल्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.
२०१३ मध्ये झाली होती मोडतोड
प्रवेश शुल्क बूथ मोडतोड प्रकरण ३ डिसेंबर २०१३ रोजी दोन खांब, धारगळ येथे घडले होते. राज्य सरकारने परराज्यातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश शुल्क लागू केले होते. हे शुल्क देण्यास नकार देत नितेश राणे व त्यांच्या ताफ्यातील सहकाऱ्यांनी कर्मचार्यांवर हल्ला करून बूथची मोडतोड केली होती.