Home >> ताज्या बातम्या >> युरी आलेमाव यांच्यासमोर विरोधकांच्या एकीचे आव्हान

युरी आलेमाव यांच्यासमोर विरोधकांच्या एकीचे आव्हान

विधानसभेचा आखाडा : कुंकळ्ळी

Story: अजय लाड |
06th July, 11:52 pm
युरी आलेमाव यांच्यासमोर विरोधकांच्या एकीचे आव्हान

काँग्रेसच्या पाठीशी राहणाऱ्या मतदारांची संख्या अधिक
प्रदूषणासह मेगा प्रकल्पांचे विषय राहणार केंद्रस्थानी
भाजप उमेदवाराने एकदाच नोंदवला विजय
‘स्वाभिमानी कुंकळ्ळकर’ ठरणार काँग्रेसची डोकेदुखी

..
गोवन वार्ता
मडगाव : कुंकळ्ळीत विद्यमान आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वडिलांचा राजकारणाचा वारसा सांभाळताना विविध विकासकामे केलेली आहेत. मात्र, कुंकळ्ळीवासीयांच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगून ‘स्वाभिमानी कुंकळ्ळकर’ या गटाने आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीत प्रदूषण, पर्यावरण रक्षण व मेगा प्रकल्प यासारखे विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.


युरी आलेमाव

कुंकळ्ळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार युरी आलेमाव हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. कुंकळ्ळी मतदारसंघात स्थानिक पातळीवर बेरोजगारीचा प्रश्न, पर्यावरण संवर्धन, मेगा प्रकल्पांना विरोध, पारंपरिक उद्योगांचे रक्षण व औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा होणारा त्रास हे मुख्य मुद्दे राहिले आहेत. विरोधी पक्षनेते या नात्याने युरी आलेमाव यांनी राज्य सरकारच्या धोरणांसह, पाणीप्रश्न, आयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न, आरोग्य सुविधांची वानवा, महागाई यासारख्या मुद्द्यांवर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदारसंघात त्यांनी स्थानिक पातळीवर लोकांच्या समस्या सोडवणे आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.
कुंकळ्ळी हा सासष्टी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. १९७७ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास याठिकाणी काँग्रेस किंवा युगोडेपासारख्या प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. येथील मतदार हे प्रामुख्याने खाणपट्टा, कृषी, औद्योगिक वसाहतीच्या भागाशी जोडलेले आहेत. भाजपला या मतदारसंघात पाय रोवण्यासाठी नेहमीच मेहनत घ्यावी लागली आहे. आमदार युरी आलेमाव यांचे वडील ज्योकीम आलेमाव यांनी २००२ व २००७ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.


क्लाफासियो डायस

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर क्लाफासियो डायस यांनी ६,४१५ मते मिळवून अवघ्या ३३ मतांनी विजय नोंदवला होता. त्यांनी अपक्ष उमेदवार ज्योकिम आलेमाव यांचा पराभव केला होता. ज्योकीम आलेमाव यांना ६,३८२ मते मिळाली होती. भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी ५,०४७ मते मिळवली होती. ‘आप’चे उमेदवार एल्विस गोम्स यांनी ३,४३७ मते मिळवली होती. गोवा विकास पार्टीच्या जॉन मोेन्तेरो यांना ४८८, तर शिवसेनेच्या देवेंद्र देसाई यांना ३१३ मते मिळाली होती.
२०१७ मध्ये काँग्रेसमधून निवडून आलेले क्लाफासियो डायस नंतरच्या राजकीय घडामोडीमध्ये भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे २०२२ मध्ये कुंकळ्ळीतील मतदारांनी पक्षांतर करणार्‍या आमदाराला नाकारून पुन्हा एकदा काँग्रेसच्या युवा नेतृत्वाला पसंती दिली. त्यामुळेे युरी आलेमाव यांनी ९,८६६ मते मिळवून ३,२३४ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा पुन्हा रोवला. भाजपचे तत्कालीन आमदार क्लाफासियो डायस यांना ६,६३२ मते मिळाली. या निवडणुकीत रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे उमेदवार विल्सन कार्दोज यांना २,४३०, तृणमूल काँग्रेसच्या जॉर्सन फर्नांडिस यांना १,२८२, तर ‘आप’च्या प्रशांत नाईक यांना ९०६ मते मिळाली होती.


एल्विस गोम्स
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आमदार युरी आलेमाव यांच्या विरोधात विरोधक एकत्र आले आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून युरी आलेमाव यांना उमेदवारी पक्की मानली जात आहे. भाजप पुन्हा एकदा हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले क्लाफासियो डायस किंवा पक्षातील इतर स्थानिक नेत्यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. क्लाफासियो डायस यांनी मतदार तसेच पक्षातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. सुदेश भिसे यांच्याकडूनही उमेदवारी मागितली जाऊ शकते. ‘आप’कडून प्रशांत नाईक यांच्याकडून दावा सांगितला जाऊ शकतो. एल्विस गोम्स यांनी ‘आप’ला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे; मात्र, ‘स्वाभिमानी कुंकळ्ळकर’ म्हणून जो विरोधकांचा गट तयार झाला आहे, त्यात एल्विस गोम्सही आहेत. या नव्या गटात सॅमी तावारिस, जॉर्सन फर्नांडिस व इतरही नेते आहेत. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षही पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत.
कुंकळ्ळी मतदारसंघातील सद्यस्थिती पाहता, युरी आलेमाव यांनी विरोधी पक्षनेते पद सांभाळल्यामुळे मतदारसंघात त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. मात्र, सत्ताबदल आणि तिसर्‍या आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे आगामी निवडणूक एकतर्फी न राहता अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. मतदारांचा कल हा नेहमी स्थानिक विकासकामे आणि पक्षाच्या निष्ठा यावरच अधिक अवलंबून राहिलेला आहे.


मी रिंगणात नसणार : प्रशांत नाईक
२०२७ ची आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही; पण कुंकळ्ळीत आम आदमी पक्ष्याचा उमेदवार रिंगणात असणार हे निश्चित असल्याचे ‘आप’चे संघटन सचिव प्रशांत नाईक यांनी सांगितले. सध्या कुंकळ्ळीचे राजकारण पाहिल्यास हे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस दिसत आहे. कुंकळ्ळीतील बैठकीत चर्चा झाल्यानुसार ‘आप’चे माजी निमंत्रक एल्विस गोम्स हे उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले आहे. पण गोम्स कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोम्स कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे त्यांनी प्रथम जाहीर करावे. त्यानुसार पुढील रणनीती आखली जाणार आहे. आम आदमी पक्षाने दोन नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली आहेत. योग्य निर्णय योग्य वेळी ‘आप’ घेईल, असे प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस-भाजप यांच्यात चुरशीची लढत
कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण गोवा जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो. २०२२ च्या मतदार यादीनुसार येथे सुमारे २९,४३२ मतदार असून त्यात सुमारे १४,३०० पुरुष व १५,१०० महिला मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा किंचित अधिक आहे. युरी आलेमाव (काँग्रेस) हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून फेरदिनो रिबेलो (जनता पक्ष), मनुएल ग्रेगोरिओ फर्नांडिस (काँग्रेस), अरेसिओ डिसोझा (यूजीडीपी), जोकिम आलेमाव (काँग्रेस), सुभाष ऊर्फ राजन नाईक (भाजप), क्लाफासिओ डायस (काँग्रेस) यांनी प्रतिनिधित्व केले आहे. कुंकळ्ळीत काँग्रेसचा पारंपरिक प्रभाव राहिला असला, तरी मतदार वेळोवेळी बदलालाही संधी देत असल्याने येथे काँग्रेस-भाजप यांच्यात चुरशीची लढत होत असते.