वाहतूक संकटात; जिल्हा केंद्राशी संपर्क तुटण्याची भीती

जोयडा : जोयडा–कारवारला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रामनगर–सदाशिवगड राज्य मार्गावरील देवळी क्रॉस येथे रस्ता पुन्हा खचल्याने वाहतुकीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) कोट्यवधी रुपये खर्च करून संरक्षण भिंत उभारून रस्त्याचे मजबुतीकरण केले होते. मात्र त्याच ठिकाणी रस्ता सुमारे एक फूट खचल्याचे समोर आल्याने विभागाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच जिल्हा केंद्राशी संपर्क तुटण्याचा धोका आहे.
विशेष म्हणजे, राज्य मार्गावरील या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गेल्या पाच-सहा वर्षांत तब्बल तीन वेळा कोट्यवधी रुपये खर्चून संरक्षण भिंती उभारण्यात आल्या, मात्र त्या कोसळल्या. यंदाही मोठा निधी खर्च करून नवीन संरक्षण भिंत उभारण्यात आली. जुना डांबरी रस्ता व माती काढून रस्त्याची पातळी खाली आणण्यात आली आणि अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आले. परंतु पहिल्याच पावसाळ्यात त्या ठिकाणी रस्ता पुन्हा खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नूज्जी ते अणशी रस्त्याची बिकट स्थिती
दरम्यान, नूज्जी ते अणशी या संपूर्ण मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडून गेले आहे. अणशी घाटात व रामनगर पासून कद्रा पर्यंत अवजड वाहनांद्वारे सुरू असलेल्या खडी वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी रस्ता दबला आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या मार्गावरून कैगा प्रकल्पासाठी अवजड वाहनांतून मोठ्या प्रमाणावर खडी वाहतूक सुरू असते. तसेच कारवार–बेळगाव, कोल्हापूर, पुणे, पिंपरी, दांडेली, जोयडा आणि रामनगरकडे धावणाऱ्या एसटी व खासगी वाहने याच मार्गाचा वापर करतात. अणशी, कुंभारवाडा आणि परिसरातील शेकडो विद्यार्थी, नोकरदार व नागरिक रोज या रस्त्यावरून प्रवास करतात. तालूक्याच्या दक्षिण पश्चिम भागातील म्हणजे कुंभारवाडा, अणशी, उळवी भागातील गावांना तालूका केंद्राशी संपर्क करण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे रस्ता खचल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हा केंद्राशी संपर्क तुटण्याची भीती
रामनगर–सदाशिवगड राज्य मार्ग हा जोयडा, दांडेली आणि हळीयाळ तालुक्याला कारवार जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा प्रमुख मार्ग आहे. पावसाचा जोर वाढल्यास रस्ता आणखी खचण्याची किंवा वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास जोयडासह या दोन्ही तालुक्याचा जिल्हा केंद्राशी संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मार्गाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.