Home >> देश -परदेश >> राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरण; आणखी तिघांची कोठडी घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरण; आणखी तिघांची कोठडी घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

सीसीटीव्हीत पैसे लपवतानाचे सुमारे ७० प्रकार; एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर तपासाला वेग

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरण; आणखी तिघांची कोठडी घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

अयोध्या : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील देणगीच्या रकमेतील कथित अपहार प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात आणखी तीन संशयितांना पोलिस कोठडी मिळावी, यासाठी अयोध्या पोलिस न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. (Ram Mandir donation scam: Ayodhya police to seek custody of 3 more accused) करुणेश पांडे, अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारकडे सादर करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्राथमिक अहवालात देणगी मोजणीदरम्यान चोरी आणि अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचे जबाब, बँक अधिकाऱ्यांची माहिती, सुरक्षा कर्मचारी, देणगी मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवेदन तसेच बँक व्यवहारांची कागदपत्रे आणि सुरक्षा नियमांची पडताळणी करण्यात आली.

अहवालानुसार, २७ एप्रिल ते ५ जून या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही कर्मचारी चलनी नोटांची बंडले तसेच रोख रक्कम कपड्यांमध्ये, खिशात, बुटांमध्ये आणि इतर ठिकाणी लपवताना दिसत आहेत. काही कर्मचारी या प्रकाराला मदत करत असल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट झाल्याचे एसआयटीने म्हटले आहे.

एसआयटीच्या मते, उपलब्ध फुटेजमध्ये अशा प्रकारच्या सुमारे ७० घटना नोंदल्या गेल्या आहेत. तसेच एप्रिलपूर्वीही अशाच घटना घडल्याची शक्यता कर्मचाऱ्यांच्या जबाबांतून व्यक्त झाली. मात्र  त्या कालावधीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने त्याची खात्री करता आली नाही.

अहवालात सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवरही बोट ठेवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची झडती, बायोमेट्रिक उपस्थिती, वैयक्तिक वस्तूंवरील निर्बंध आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या नियमांचे प्रभावी पालन झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज, जप्तीची नोंद, आर्थिक कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे आणि रमाशंकर मिश्रा यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा प्रबल संशय एसआयटीने व्यक्त केला आहे.  यापैकी अविनाश शुक्ला आणि मनीष कुमार यादव हे वारंवार रोख रक्कम लपवताना दिसल्याचे, तर इतरांनीही त्यांना मदत केल्याचे अहवालात नमूद आहे.

चंपत राय, अनिल मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारला

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांना ट्रस्टच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा