जयंत पाटील-विनोद तावडे यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. भाजपकडून राष्ट्रीय स्तरावरील संख्याबळ मजबूत करण्याच्या हालचालींमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यास त्यांना मिळणाऱ्या राजकीय वाट्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा : कॉंग्रेस
दरम्यान, या चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी विचारधारा सोडून तिकडे जायचे की विचारांची कास धरून आमच्यासोबत राहायचे, हा निर्णय त्यांनी घ्यावा. आमच्याकडे यायचे असल्यास त्यांचे स्वागत आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. मात्र, त्यांच्याकडून चर्चेसंदर्भात कोणताही अधिकृत संदेश आलेला नाही," असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या भूमीकेकडे लक्ष
राजकीय वर्तुळात या घडामोडींना मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, शरद पवार गटाकडून या चर्चांवर अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या सर्व घडामोडी चर्चेच्या पातळीवर असून, संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या आमदारांची सविस्तर यादी
जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा)
जयंत पाटील (इस्लामपूर)
रोहित पवार (कर्जत-जामखेड)
रोहित पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ)
संदीप रवींद्र क्षीरसागर (बीड)
नारायण गोविंदराव पाटील (करमाळा)
अभिजीत पाटील (माढा)
खरे राजू ज्ञानू (मोहोळ)
उत्तमराव शिवदास जानकर (माळशिरस)
बापूसाहेब तुकाराम पाठारे (वडगाव शेरी)
शरद पवार गटाचे लोकसभा खासदार
१. सुप्रिया सुळे - बारामती
२. अमर शरदराव काळे - वर्धा
३. भास्कर भगरे - दिंडोरी
४. सुरेश म्हात्रे - भिवंडी
५. निलेश ज्ञानदेव लंके - अहमदनगर
६. डॉ. अमोल कोल्हे - शिरूर
७. धैर्यशील मोहिते-पाटील - माढा
८. बजरंग सोनवणे - बीड