
मडगाव : ‘जाग’ या कोकणी नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शणै गोंयबाब यांच्यावरील एका लेखावरून निर्माण झालेल्या वादानंतर, लेखक तथा उद्योजक दत्ता नायक यांनी कोकणी भाषा मंडळच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच मंडळाला जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या देणगीतील उर्वरित रक्कमही त्यांनी मागे घेतली आहे.
कोंकणी भाषा मंडळ आणि अखिल भारतीय कोकणी परिषद यांनी दत्ता नायक यांनी जाग या नियतकालिकात लिहिलेल्या या लेखावर आक्षेप घेतला होता. त्यांनी नाईक यांनी लेखात केलेल्या लिखाणाबाबत आक्षेप असल्याचे प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. त्यानंतर आता दत्ता नायक यांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलले.
कोंकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष सेराफिन कॉता यांना व्हॉट्सअॅपवर तसेच कोकणी भाषा मंडळ यांच्या मेलवर राजीनामा पत्र पाठवण्यात आलेले आहे. कोकणी भाषा मंडळाला पाठवलेल्या पत्रात दत्ता नायक यांनी झाल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाच व्यक्तीच्या प्रभावाखाली दोन्ही संस्था काम करत असल्याचा आरोपही नायक यांनी या पत्रात केला आहे. या वादामुळे कोंकणी साहित्यिक वर्तुळात सध्या हा विषय चर्चिला जात आहे. याशिवाय दत्ता नायक यांनी कोकणी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी १ कोटी रुपयांची देणगी जाहीर केलेली होती. या देणगीतील उर्वरित रक्कमही मागे घेण्यात येत असल्याचे नायक यांनी संस्थेला सांगितले आहे.
कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष सेराफिन कॉता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. साहित्यिक व उद्योजक दत्ता नायक यांनी संदेश पाठवून व मेल द्वारे राजीनामा संस्थेकडे पाठवलेला आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांपैकी २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम संस्थेला दिलेली आहे.
मात्र आता त्यांनी उर्वरित रक्कम देणार नसल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे. कोकणी भाषा मंडळाचे पदाधिकारी पुढील दोन दिवसांत दत्ता नायक यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा केली जाईल असेही स्पष्ट केले.