Home >> विचार >> देवराई परंपरेमागची प्रेरणा

देवराई परंपरेमागची प्रेरणा

आपल्या आराध्याचा अधिवास सिमेंट काँक्रिटच्या चार भिंतीत बंदिस्त नसून, तो देवराईतच आहे आणि त्यामुळे तेथील वृक्षवेलींचे आत्मीयतेने रक्षण न करता त्यांची तोड केली, तर दैवतांचा प्रकोप होऊन, आपणावर नुकसानीला सामोरे जाण्याची पाळी येईल, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे अशा देवराया बराच काळ सुरक्षित राहिल्या.

Story: विचारचक्र |
4 hours ago
देवराई परंपरेमागची प्रेरणा

आज गोवा राज्य देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेले असले तरी आपल्या पूर्वजांनी वृक्षवेलींच्या सान्निध्यात जीवन जगत असताना देवाच्या नावाने घनदाट जंगलांनी समृद्ध वनराईच्या संरक्षण आणि संवधर्नाला प्राधान्य दिले होते. अशा देवराया गोव्यातील पेडणे ते काणकोणपर्यंतच्या लोकमानसाने श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून  राखून ठेवल्या होत्या. आज त्यातल्या बऱ्याच देवराया तेथे बांधल्या जाणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या मंदिरांमुळे तसेच रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीमुळे विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. 

दिव्य देह धारण करणारा देव या संज्ञेला प्राप्त असून ती दिव्य अशी शक्ती अदृश्य रूपाने सर्वत्र संचार करते. भक्ताची श्रद्धा-भक्ती उत्कट झाल्यास ती दृश्य स्वरूपात अभिव्यक्त होते, अशी लोकधारणा रूढ आहे. मानवाला त्याच्या आदिम अवस्थेत देवतांचा साक्षात्कार झाला असावा, कालांतराने मानव जसजसा विचाराने आणि भौतिक समृद्धीने प्रगती करू लागला, तसतशी या देवतांतूनच धर्माची उत्पत्ती झाली आणि त्यातून विविध तत्त्वज्ञाने उगम पावली. माणसाला त्याच्या भोवतालच्या पंचमहाभूतांचे जे भय वाटले, त्या भयातूनच देव तत्त्वाचा जन्म झाला. वादळी वारे, विद्युत्पात, मेघगर्जना, भूकंप, महापूर, अतिवृष्टी, अनावृष्टी हे नैसर्गिक उत्पात पाहताना व अनुभवताना माणसाला वाटले की या कोणीतरी प्रचंड शक्तीच्या देवता आहेत आणि आपण त्यांच्यासमोर तोकडे आहोत. त्या देवतांनी आपले अहित, अशुभ करू नये, यासाठी मानवाने त्या देवतांच्या पुढे नतमस्तक होऊन, त्यांची प्रार्थना आरंभिली. प्राथमिक अवस्थेतील मानवाने ज्या ठिकाणी वसाहत केली, त्याच ठिकाणी आपल्या संरक्षक देवतेचीही कल्पना करून तिची आराधना व बलिदान यांच्यासाठी गावाबाहेर एक जागा ठरवून टाकली. गावाबाहेर एखाद्या मोकळ्या जागी किंवा वृक्षातील 'गडगा' देवस्थान सूचित करत असे. वृक्षवेलींनी समृद्ध जागेत कधी 'गडगे' तर कधी वेगवेगळ्या आकारातले दगड ठेवण्यात येऊ लागले. वर्षातून काही ठराविक दिवशी अशा जागेत प्रार्थना करण्यासाठी भाविक जाऊ लागले. देवाचे वसतिस्थान असलेल्या अशा जंगलांना कुठे 'देववन', कुठे 'सास्ता', कुठे 'सर्पकवू' तर कुठे 'देवराकडू' म्हणण्यात येऊ लागले. मानवाच्या प्राथमिक अवस्थेत तो निसर्गातील दगड, डोंगर, वृक्ष, नदी, पशू व पक्षी यांना त्याचप्रमाणे विविध शक्तींना देव मानीत होता. त्याची बुद्धी विकसित झाल्यावर त्याच्या मनात दैवी किंवा दानवी शक्ती संदर्भातील निश्चित कल्पना जन्माला आली आणि त्या कल्पनांना स्वरूप प्रदान केले. त्यातून दगड, लाकूड, धातू आदी घटकांपासून आपल्या आराध्य दैवतांच्या मूर्ती साकारण्याची परंपरा निर्माण झाली. गोवा-कोकणातील काही भारतीय लोकमानसात मूर्तीपुजेच्या संचितांसाठी देवराया देवदेवतांच्या मूर्तीसाठी ख्यात असून, सह्याद्रीतील काही गावांत मूर्तीनी युक्त देवालये आहेत. देवराईच्या सानिध्यात गावं वसलेली असल्याने तिथले लोक धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींसाठी अशा देवरायांशी निगडित होते. सत्तरीत म्हादई अभयारण्यात साटरे, देरोडे आणि कोदाळ येथील गावकरी अर्धशतकापूर्वी देवरायांच्या सानिध्यात राहत होते. त्यांचे जुने गाव देवरायांच्या सानिध्यात असल्याने त्यांना तिथल्या वृक्षवेली, पशुपक्ष्यांविषयीची आत्मीयता होती. या गावातील लोकांनी आपल्या जुन्या वसतिस्थानाचा त्याग करून शिक्षण, उद्योगधंद्यांनिमित्त सोयीस्कर ठरणाऱ्या नव्या जागी स्थलांतर केले आणि देवाधर्मासाठी वारंवार देवराईतील देवदेवतांचे भजन, पूजन करण्यास जाणे कठीण ठरत असल्याने नव्या लोकवस्तीजवळ देवालयांची उभारणी केली. सिमेंट काँक्रिटची अशी देवालये गावी उभी राहिली असली, तरी ग्रामदैवत आणि पंचायतनातील दैवते यांच्या पाषाणी मूर्ती देवरायांतून आजतागायत स्थलांतरित करण्यासाठी गावकरी धजलेले नाहीत. त्यामुळे साटरे गावातील देवराईत महिषासुरमर्दिनीच्या रूपातली सातेरी, गडालक्ष्मीच्या रूपातली केळबाय, दोन्ही बाजूंना फणाधारी नाग असलेली ब्राह्मणी आदी देवतांच्या सुंदर मूर्ती तिथे पाहायला मिळतात. वर्षातून ठरावीक सण उत्सवाच्या प्रसंगी गावकरी देवराईतील मूर्तीचे पूजन करण्यासाठी भेट देतात.

देरोडे गावातल्या लोकांनी देवराईपासून अगदी हाताच्या अंतरावर वास्तव्य करण्यास प्राधान्य दिल्या कारणाने आणि सातेरी आणि केळबाय यांच्या मूर्ती देवराईतच ठेवल्याने धार्मिक कार्यासाठी गावकरी देवराईत जातात. कोदाळ गावात गावकऱ्यांनी नवे मंदिर बांधलेले असले तरी त्यांच्या सातेरी, केळबाय, ब्राह्मणी त्याचप्रमाणे नंदी-शिवलिंग आदी मूर्ती 'देवाचो हुडो' येथे आहेत. सत्तरीत असलेल्या कुडशे गावातील देवराई आज बागायतीच्या विस्तारात आपले अस्तित्व हरवत चालली असून, आंबा, भेरलीमाड यासारखी काही मोजकी वृक्षसंपदा वगळता अन्य जैविक संपत्ती नाममात्र शिल्लक राहिली आहे. कुडशेच्या देवराईत गोव्यातली गजलक्ष्मी स्वरूपातील केळबाय देवतेची महाकाय मूर्ती आहे. दोन्ही हातात कमळांचे कळे धारण केलेली ही देवी ध्यानमुद्रेत आसनस्थ असून दोन्ही बाजूंना लक्ष्मीच्या मस्तकी जलकुंभाद्वारे अभिषेक करणारे आभुषणांनी युक्त हत्ती चित्रित केलेले आहेत. खांद्यावर पाण्याने भरलेले कुंभ, हाताने मृदुंगासारखे लोकवाद्य वाजवणारे लोककलाकार यांची मिरवणूक असून स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन दाखवले आहे. दोन बाजूला गोव्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या माडाची चित्रे आहेत. आजपर्यंत ज्या गजलक्ष्मीच्या मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यातली ही मूर्ती शिल्पकाराच्या अत्युच्च कलागुणांचा आविष्कार घडवते. म्हादई नदीच्या उजव्या तीरावर वसलेल्या या देवराईतील गजलक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत 

असावेत.

आपल्या आराध्य देवतेची पाषाणी मूर्ती कोणत्याच छप्पराविना देवराईत स्थापन करण्याची परंपरा निर्माण झाली आणि अशा देवरायांच्या माध्यमातून वृक्षवेलीच नव्हे, तर त्यातल्या समस्त जैविक संपदेच्या घटकांनाच नव्हे, तर निर्जिव घटकांनाही संरक्षण देण्याची कामगिरी स्थानिक जंगलनिवासी लोकसमूहाने केली होती. आपल्या आराध्याचा अधिवास सिमेंट काँक्रिटच्या चार भिंतीत बंदिस्त नसून, तो देवराईतच आहे आणि त्यामुळे तेथील वृक्षवेलींचे आत्मीयतेने रक्षण न करता त्यांची तोड केली, तर दैवतांचा प्रकोप होऊन, आपणावर नुकसानीला सामोरे जाण्याची पाळी येईल, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे अशा देवराया बराच काळ सुरक्षित राहिल्या आणि जंगली श्वापदांसाठी आश्वासक आश्रयस्थान ठरल्या होत्या. आज त्यातल्या काही देवराया कधीच नष्ट झाल्या, तर काहींची स्थिती विकल झालेली आहे.

गोवाभर वनमहोत्सवाच्या निमित्ताने आमच्या समृद्ध अशा देवराई परंपरेचे वैभव आणि त्यांना लाभलेला इतिहासाचा वारसा जाणून घेतला आणि त्याद्वारे त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी लोक सहभागातून  मोहीम राबवली, तर देवराईच्या उत्थानात नवीन पिढी आपले योगदान करण्यासाठी कार्यरत होईल.


- राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५