
हवामान बदलाचे परिणाम आता विकसित देशांनाही तीव्रतेने जाणवू लागले आहेत. युरोपमध्ये सध्या भीषण उष्णतेच्या लाटेने थैमान घातले असून अनेक देशांमध्ये विक्रमी उष्णतेमुळे रस्ते वितळणे, रेल्वेचे रुळ वाकणे, वीज उत्पादनावर परिणाम होणे आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
पश्चिम युरोपातून सुरू झालेली उष्णतेची लाट आता मध्य आणि पूर्व युरोपपर्यंत पोहोचली आहे. डेन्मार्कमध्ये १८७४ नंतरचा सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. स्वित्झर्लंडमधील बासेल येथे ३८.८ अंश, तर झेक प्रजासत्ताकात विक्रमी ४०.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ब्रिटनमध्येही जून महिन्यात १९७६ नंतर प्रथमच तापमान ३७.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.
जर्मनीतील बर्लिनजवळील ए-२ मोटरवेवर उष्णतेमुळे काँक्रिटचे स्लॅब तडकून महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे रुळ तापमानामुळे फैलावत असल्याने जर्मनीच्या रेल्वे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. अनेक ठिकाणी ट्राम आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
फ्रान्समध्ये उष्णतेमुळे अणुऊर्जा प्रकल्पांच्या शीतकरण प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारी वीज कंपनीला काही अणुऊर्जा प्रकल्पांमधील वीज उत्पादन कमी करावे लागले असून, ऊर्जा पुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे अनेक देशांतील आरोग्य व्यवस्था तणावाखाली आली आहे. जर्मनीतील एका नर्सिंग होममध्ये तापमान ३५ अंशांवर गेल्याने वृद्धांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्व ३८ सरकारी रुग्णालयांत आणीबाणीची योजना लागू करण्यात आली आहे.
आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन पॅरिसमधील काही सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. इटलीने रोम, मिलान आणि व्हेनिससह १८ शहरांमध्ये रेड हीट अलर्ट जारी केला आहे. ब्रिटनमध्ये अँबर हीट वॉर्निंग लागू करण्यात आली असून, उष्णतेपासून बचावासाठी तलाव आणि नद्यांमध्ये उतरलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे अशा तीव्र उष्णतेच्या लाटा भविष्यात अधिक वारंवार आणि अधिक तीव्र स्वरूपात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
- सुदेश दळवी