गोवा सरकारने वारकऱ्यांना दिलेला मदतीचा हात हा वारकरी पथकांचे अनेक प्रश्न सोडवू शकतो. राज्य सरकारने गोव्यातील भाविकांसाठी पंढरपूर आणि अयोध्येत भक्तनिवासाचीही व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या घटकांचा विचार सरकारकडून होतो, हे चांगलेच आहे. अशा योजनांचे स्वागत व्हायला हवे.

संत तुकारामांचा अभंग आहे 'पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।' शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी जे अभंगातून म्हटले आहे ते आजही अख्खा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि विठ्ठल-रखुमाईचे भक्त जिथे म्हणून आहेत तिथे लागू पडते. असे म्हणतात की, पंढरीच्या रायाची पायी वारी केली की आणखी कुठले तीर्थक्षेत्र करायची गरज नाही. एवढे पावित्र्य, भक्ती, श्रद्धा, सुख सारे काही या वारीत आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वाऱ्यांपैकी आषाढ वारी सर्वांत महत्त्वाची. या वारीला लाखो भक्त पंढरपूरच्या वाटेवर असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांप्रमाणेच गेल्या काही वर्षांत गोव्यातूनही हजारो भाविक पंढरपूरच्या वारीला जातात. एक-दोन करता करता सध्या ३० ते ४० पथके वारी करतात. चोर्ला घाट किंवा तिळारी घाटातून गोव्यातील वारकरी पंढरपूरला रवाना होतात. गोव्यातील वारकरी गेल्या काही वर्षांपासून सरकारकडून अनुदान मिळावे म्हणून प्रयत्न करत होते. अखेर राज्य सरकारने गोव्यातील वारकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना चांगल्या प्रकारे अनुदानही देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात जे अनुदान वारकरी पथकांना मिळते त्यापेक्षा गोवा सरकारकडून मिळणारे अनुदान कित्येक पटीने जास्त आहे.
यंदा आषाढी एकादशी २५ जुलै रोजी आहे. त्यामुळे पायी वाऱ्या सुरू झाल्या आहेत. ७ जुलै रोजी देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल. ८ जुलै रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातून भाविकांच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत. काही वाऱ्या अजून सुरू व्हायच्या आहेत. जेवढे अंतर आहे, त्याच्या अंदाजानुसार वारी सुरू होते. गोवा ते पंढरपूर हे अंतर सुमारे ३५० किलोमीटरच्या आसपास आहे. गोव्यातील वारकरी येत्या दोन दिवसांत वेगवेगळ्या मार्गाने प्रस्थान करणार आहेत. पावसाचे दिवस असतानाही अनेक पुरुष, महिला या वारीत सहभागी होतात. सुमारे १५ दिवसांचा प्रवास करून आषाढीपर्यंत पंढरपूरला पोहोचतात. वारकऱ्यांचा कसलाही स्वार्थ नसतो. पांडुरंगाच्या भक्तीने, ओढीने हे वारकरी सारे अंतर पार करून चालत पंढरपूरला पोहोचतात. पंढरपूरला पोहोचणे म्हणजेच पांडुरंगाला तुमचे येणे कळले, असाच वारकऱ्यांचा समज असतो. त्यामुळे अनेक वारकरी दर्शनाशिवाय परत येतात. गोव्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढू लागल्यामुळे आता वारीची पथकेही वाढत आहेत. सरकारने नियमात बसणाऱ्या ३६ वारकरी पथकांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यात पैसेही हस्तांतरित होतील. इतर राज्यांच्या तुलनेत गोवा सरकारने पथकांना भरघोस मदत दिली आहे, हे विशेष. एका पथकात ५० लोक असल्यास त्यांना दिवसाचा खर्च सुमारे २० हजार रुपये असतो. १६-१७ दिवस प्रवास आणि नंतर माघारी येणे, यावर ५० जणांच्या गटाला तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. वर्गणी, देणगी आणि वाटेत हितचिंतकांकडून होणारी सेवा यामुळेच वारी आणखी सोपी होते. ती कठीण कधीच झालेली नाही. कारण वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची सेवा मानणाऱ्यांची संख्या वारकऱ्यांपेक्षा मोठी असते, त्यामुळेच वारकऱ्यांना कशाची कमतरता भासत नसते. त्यात गोवा सरकारने वारकऱ्यांना दिलेला मदतीचा हात हा वारकरी पथकांचे अनेक प्रश्न सोडवू शकतो.
राज्य सरकारने गोव्यातील भाविकांसाठी पंढरपूर आणि अयोध्येत भक्तनिवासाचीही व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या घटकांचा विचार सरकारकडून होतो, हे चांगलेच आहे. अशा योजनांचे स्वागत व्हायला हवे. या योजनेमुळे भविष्यात वारीसाठी जाणाऱ्यांची आणि पथकांची संख्याही वाढू शकते. वारी हा भक्तीचा मार्ग आहेच, पण तो चांगल्या आरोग्याचा संदेश देण्याचा मार्ग आहे. वारीत कोणी लहान, मोठा नसतो. गरीब किंवा श्रीमंत नसतो. सर्वांचा अहंकार तिथे गळून पडलेला असतो. पांडुरंगाच्या भक्तीचा आणि सुखाचा मार्ग दाखवणाऱ्या वारीत सहभाग घेणाऱ्यांची संख्या वाढत जावो!