‘धुरंधर’सिरीजचा जागतिक विक्रम; ३,००० कोटींचा टप्पा पार


34 mins ago
‘धुरंधर’सिरीजचा जागतिक विक्रम; ३,००० कोटींचा टप्पा पार

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी गुरुवारचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या फिल्म सीरिजने जागतिक बॉक्स ऑफिसवर ३,००० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार करून नवा इतिहास रचला आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात इतकी अवाढव्य कमाई करणारी ही पहिलीच फिल्म फ्रँचायझी (सीरिज) ठरली आहे. धुरंधर या सीरिजच्या पहिल्या भागाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवले. सुरुवातीला काही शंका व्यक्त केल्या जात असतानाच, प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. पहिल्या भागाने जागतिक स्तरावर १,३०० कोटींहून अधिक कमाई केली. धुरंधर २ (द रिव्हेंज) या दुसऱ्या भागाने तर यशाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले. रणवीर सिंगच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने १,७०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, भारतात एकाच भाषेत १,००० कोटी नेट कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. ३,००० कोटींच्या या विक्रमी घोडदौडीत 'धुरंधर'ने भारतातील इतर दिग्गज फिल्म सीरिजला मागे टाकले आहे.
‘धुरंधर’ सीरिजने केवळ विक्रम मोडले नाहीत, तर भारतीय सिनेमाचा दर्जा नव्या उंचीवर नेला आहे. ३००० कोटींचा टप्पा म्हणजे फक्त आकडा नाही, तर भारतीय सिनेमाच्या बदलत्या काळाचे प्रतीक आहे.
‘धुरंधर’ सीरिजने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या फ्रँचायझींना मागे टाकले आहे. बाहुबली सिरीज सुमारे २,४३८ कोटी, पुष्पा सिरीजने सुमारे २,०९२ कोटी कमावले होते. यांच्या तुलनेत ‘धुरंधर’ने ३००० कोटींचा टप्पा पार करत नवा इतिहास रचला आहे. या फ्रँचायझीच्या यशामागे जबरदस्त अ‍ॅक्शन आणि सादरीकरण, देशभक्तीचा टच आणि भावनिक कनेक्शन, प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये आणणारी स्टोरी हे घटक कारणीभूत आहेत. ‘धुरंधर’चे यश केवळ कमाईपुरते मर्यादित नाही. हे भारतीय सिनेमासाठी एक मोठे पाऊल आहे, जे दाखवते की आता भारतीय फिल्म फ्रँचायझी जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतात.

हेही वाचा