नवी दिल्ली : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाने अनेक दिग्गज राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार कपिल सिब्बल, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी तसेच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा समावेश आहे.
मतदार यादीतील नोंदी आणि उपलब्ध जुन्या रेकॉर्डमधील माहितीची पडताळणी करण्यासाठी या नोटिसा पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रकरणांमध्ये नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक, नावातील विसंगती किंवा जुन्या मतदार यादीतील नोंदीशी माहिती जुळत नसल्याचे आढळून आले आहे.
निवडणूक आयुक्त एसएएस संधू यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये निवडणूक रेकॉर्डमध्ये फरक आढळल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावाशी संबंधित नोंदींचीही पडताळणी करण्यात येत आहे. कपिल सिब्बल आणि विक्रम मिस्त्री यांच्या बाबतीतही आयोगाच्या रेकॉर्डमधील माहिती आणि उपलब्ध नोंदींमध्ये तफावत असल्याचे सांगितले जाते.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही अशाच स्वरूपाच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आहे.
बिहारपासून एसआयआर प्रक्रियेला सुरुवात
विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया सर्वप्रथम बिहारमध्ये सुरू करण्यात आली होती. २४ जून २०२५ रोजी बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही ही प्रक्रिया राबवण्यात आली.
या प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतील नोंदींची तपासणी करून आवश्यक कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे पात्रता पडताळली जात आहे. त्यामुळे नावातील तफावत किंवा माहिती जुळत नसल्यास संबंधित मतदारांकडून स्पष्टीकरण अथवा आवश्यक कागदपत्रे मागवली जात आहेत.


