पणजी : गोव्यातील निम्म्याहून अधिक नोंदणीकृत सहकारी संस्थांकडे कोणताही आर्थिक हिशेब नाही. यामध्ये स्वयंसहाय्य गट सहकार संस्थांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे १०० टक्के आहे, असे सहकार खात्याने जारी केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील विस्तीर्ण सहकारी क्षेत्राच्या आर्थिक देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खात्याने दिलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण ५,८५४ नोंदणीकृत सहकारी संस्थांपैकी ३,३५७ संस्थांची आर्थिक माहिती उपलब्ध नाही; ज्यांचे प्रमाण एकूण संस्थांमध्ये ५७.४ टक्के इतके आहे.
या आकडेवारीनुसार, ४,९८५ संस्था कार्यरत असून ६९६ संस्था अकार्यक्षम आहेत. इतर १६५ संस्था दिवाळखोरीत निघाल्या असून ८ संस्था बरखास्त करण्यात आल्या आहेत. तसेच १,७४६ संस्था फायद्यात चालत असून ७४३ संस्था तोटा सहन करत आहेत. मात्र, ३,३५७ संस्थांच्या मोठ्या गटाची कोणतीही आर्थिक माहिती उपलब्ध नाही.
या यादीत पहिल्या क्रमांकावर स्वयं सहाय्यता गट सहकार क्षेत्र येते; जिथे नोंदणीकृत १४६७ संस्थांपैकी सर्वच्या सर्व (१४६७) संस्थांची कोणतीही आर्थिक माहिती उपलब्ध नाही. आर्थिक हिशोब नसण्याचे या क्षेत्रातील प्रमाण १०० टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर ८४ टक्क्यांसह कामगार सहकार संस्था, ७६ टक्क्यांसह उद्योग सहकार क्षेत्र तिसऱ्या आणि ५३ टक्क्यांसह मच्छीमार सहकार क्षेत्र चौथ्या क्रमांकावर येते.
सर्वात कमी म्हणजे ८.८५ टक्केवारीसह दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांनी सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. 


