केएलई रुग्णालय आणि जेजीएमएमएमसी वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. सोबत डॉ. प्रभाकर कोरे व इतर. (लुईस रॉड्रिग्स)
गोवन वार्ता प्रतिनिधी
बेळगाव
केएलई संस्थेने जागतिक स्तरावर मान्यता मिळविली आहे. संस्थेच्या विस्तारात दिवंगत जगद्गुरू गंगाधर महास्वामीजी, जगद्गुरू राजयोगींद्र महास्वामीजी आणि पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. जेजीएमएम वैद्यकीय महाविद्यालयाने २०२० मध्ये हुबळीत कामकाज सुरू केले होते. या भागातील वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ते विकसित झाले आहे. नव्या रुग्णालयामुळे हुबळी-धारवाड भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.
हुबळी येथील गब्बूर येथे केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या वतीने उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गंगाधर महास्वामीजी मूरुसविरमठ मेडिकल कॉलेज (जेजीएमएमएमसी), केएलई हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे शनिवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते; मात्र नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉटेलमध्येच विश्रांती घेतली. नंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले.
कुलपती पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, केएलई संस्थेने ११० वर्षांची सेवा पूर्ण केली असून संस्थेअंतर्गत ३२० संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये १.४८ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. केएलई संस्थेअंतर्गत सुमारे ४,५०० खाटांची क्षमता असलेली १६ रुग्णालये कार्यरत असून पैकी १,२०० खाटा मोफत आरोग्यसेवेसाठी उपलब्ध आहेत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री शरण प्रकाश पाटील, मूरुसविरमठाचे जगद्गुरू श्री राजयोगींद्र महास्वामीजी यांनीही समयोचित भाषण केले. या कार्यक्रमाला राजकीय नेते, केएलई संस्थेचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी तसेच हुबळी-धारवाड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तब्येत बिघडल्याने अमित शहा दिल्लीला रवाना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हुबळीनंतर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते; मात्र अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. हुबळी येथील कार्यक्रमानंतर प्रकृतीत अस्वस्थता जाणवल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. त्यानंतर ते हुबळीतून दिल्लीकडे रवाना झाले.


