आयआयएम नागपूरच्या पथकाकडून पर्वरी उड्डाणपुलाची पाहणी

आयआयएम नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने पर्वरी उड्डाणपुलाच्या सुरक्षेची पाहणी केली. या तज्ज्ञ पथकाच्या अभियांत्रिकी शिफारशी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाहतूक व्यवस्थेतील संभाव्य सुधारणा आणि सुरक्षेच्या उपायांबाबत पुढील अंतिम निर्णय घेतले जातील.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
आयआयएम नागपूरच्या पथकाकडून पर्वरी उड्डाणपुलाची पाहणी

पणजी : आयआयएम नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने आज शनिवार, १९ सप्टेंबर रोजी पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडोअरची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. उड्डाणपुलावरील अपघात प्रवण क्षेत्रे, धोकादायक वळणे, वाहनांची वेगमर्यादा आणि मुख्य प्रवेश मार्गांचा तांत्रिक आढावा या पथकाने घेतला. पर्वरीतील स्थानिक रहिवाशांना या एलिव्हेटेड कॉरिडोअरवर सुरक्षितपणे प्रवेश करता यावा आणि या आधुनिक सुविधेचा त्यांना थेट लाभ मिळावा, यासाठी प्रवेश मार्ग आणि पर्यायी रस्त्यांची चाचपणी करणे हा या पाहणीचा मुख्य उद्देश होता.




या तांत्रिक पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता संदीप चोडणकर यांच्यासह खात्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि वाहतूक पोलीस यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आता या तज्ज्ञ पथकाच्या अभियांत्रिकी शिफारशी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाहतूक व्यवस्थेतील संभाव्य सुधारणा आणि सुरक्षेच्या उपायांबाबत पुढील अंतिम निर्णय घेतले जातील.




मागेच पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकल्पाच्या नियोजन आणि निर्णयप्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा उड्डाणपूल आपल्या मतदारसंघात येत असूनही यासंदर्भातील निर्णय घेताना प्रशासनाने आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा त्यांचा आरोप होता. सुमारे अडीच वर्षे चाललेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे पर्वरीतील नागरिकांना वाहतूक कोंडी. धूळ-प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आता या प्रकल्पाचा थेट आणि प्रत्यक्ष लाभ पर्वरीवासीयांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयावर तातडीने बैठक आयोजित करून स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधण्यात यावा आणि पर्वरीकरांच्या हिताला प्राधान्य दिले जावे, अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केली होती.


A landmark step for Goa's connectivity, the 6-Lane Porvorim Elevated  Corridor on NH-66 marks a significant addition to the State's  infrastructure network. Spanning 5.15 kilometres and built at a sanctioned  cost of


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ९ सप्टेंबर रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी या पुलावर घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून पुलावरून दुचाकी वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली. हॉटेल निओ मॅजेस्टिकजवळील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले आहेत. तसेच वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आज पार पडलेल्या पाहणीतून सकारात्मक निष्कर्ष निघून पर्वरीकरांना दिलासा मिळे का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

हेही वाचा
सर्व पहा