फोंडा : भोमा येथील सातेरी देवीच्या घुमटीला शनिवारी सकाळी टेम्पो ट्रॅव्हलरची धडक बसून चालकासह एकूण ७ प्रवाशी जखमी झाले. जखमींवर त्वरित मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. गेल्या ३ महिन्यात त्याच स्थळावर दुसरा अपघात घडल्याने स्थानिक लोक पुन्हा बगल रस्त्याची मागणी करू लागले आहेत.
प्राप्त माहिती नुसार शनिवारी सकाळी दावणगिरी -कर्नाटक येथून केए-१३-बी - ७३९० क्रमांकांची टेम्पो ट्रॅव्हलर मधून एकूण १२ जण गोवा पाहण्यासाठी आले होते.मोलेहून पणजी येथे जात असताना भोमा येथे पोहोचल्यावर टेम्पो ट्रॅव्हलरची रस्त्याच्या बाजूला आसलेल्या सातेरी देवीच्या घुमटीला धडक बसली. यात टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावर कोसळली.
स्थानिक लोकांनी त्वरित धाव घेऊन अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या ७ जणांना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यावर म्हार्दोळ पोलीस तसेच फोंडा पोलिसांनी अपघात स्थळावर धाव घेतली.
अपघातानंतर काही वेळ फोंडा - पणजी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम दिसून आला. फोंडा वाहतूक पोलिसांनी स्थितीवर लक्ष ठेवून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पंचनामा म्हार्दोळ पोलिसांनी केला.


