विरोधी पक्षांकडे मुद्दे उरलेले नाहीत; भाजप सरकार पारदर्शक आणि विकासभिमुख: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेत 'डबल इंजिन' सरकारचा विकास जनतेसमोर असल्याचे सांगितले. गणेशोत्सवातील भेटींवर दामू नाईक यांनीही प्रतिक्रिया दिली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
विरोधी पक्षांकडे मुद्दे उरलेले नाहीत; भाजप सरकार पारदर्शक आणि विकासभिमुख: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : भारतीय जनता पक्षाचे सरकार हे पूर्णपणे पारदर्शक असून त्याला कोणीही एक्स्पोज करण्याची गरज नाही, अशा थेट शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षांच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या 'डबल इंजिन' कार्यकाळात गोव्यात पायाभूत सुविधांचा आणि मानवी संसाधनांचा विकास झाला असून हा विकास संपूर्ण गोव्यातील जनतेने प्रत्यक्ष अनुभवला आहे, असे ते म्हणाले. विरोधकांकडे सध्या बोलण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या 'गोवा राखण यात्रेवर' आणि राजकीय हालचालींवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या एका महिन्याच्या कालावधीत राज्यभरात 'सेवा संकल्प अभियान' राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत सरकार आणि पक्षाचे कार्यकर्ते पेडणे ते काणकोणपर्यंत पोहोचून सरकारने शिक्षण, आरोग्य आणि इतर सर्व क्षेत्रांत केलेल्या विकासाची माहिती जनतेसमोर मांडत आहेत. आम्ही केलेल्या कामांच्या जोरावर जनतेसमोर जात आहोत आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या अभियानाची सुरुवात करताना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, 'आयुष्मान भारत' योजनेसोबतच गोव्यात दिव्यांगांसाठी विनामूल्य साहित्य आणि साधने पुरवणारे केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात स्पाइन सेंटरसारख्या अद्ययावत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारच्या काळात गोव्यात आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रांत अनेक मोठी कामे झाली असून ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष फक्त राजकीय स्टंटबाजी करत असून त्यांच्या आरोपांना कोणताही आधार उरलेला नाही. आगामी निवडणुकांतील उमेदवारीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही, याचा अंतिम निर्णय हा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय निवडणूक समिती सर्वसंमतीने घेते. त्यामुळे राजकीय अफवांना कोणताही आधार नसून सरकार आपले पूर्ण लक्ष विकासकामे आणि सेवाकार्यावर केंद्रित करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शेवटी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजप नेते दामू नाईक यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विनय तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री बालकृष्ण (बाबू) पार्सेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 राजकीय भेटीगाठींवरून रंगणाऱ्या चर्चांवर दामू नाईक यांनी माध्यमांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली. गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात राजकीय मतभेद विसरून विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी एकमेकांच्या घरी गणेश दर्शनासाठी भेट देत असतात. मात्र, या सौजन्यपूर्ण भेटींना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि आनंदाचा भाग असून या दिवसांत राजकीय विषय बाजूला ठेवून देवाचे दर्शन घेणे आणि एकमेकांना भेटणे हीच गोव्याची परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पक्षांतर्गत किंवा संघटनात्मक विषयांवर भाष्य करताना नाईक म्हणाले की, पक्षाच्या काही अंतर्गत बाबी असल्यास त्यावर योग्य त्या पक्षीय व्यासपीठावरच चर्चा केली जाते आणि तिथेच त्यावर मार्ग काढला जातो. २०१२ पासून आपण पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून पक्षाची संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धतीची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आम्ही सर्वजण गोमंतकीय आहोत, त्यामुळे चतुर्थी असो, नाताळ असो वा दिवाळी, सण-उत्सवांच्या काळात एकमेकांच्या घरी जाणे, गोडधोड खाणे आणि आनंद द्विगुणित करणे हेच गोव्याचे मूळ सौंदर्य आहे. या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा कोणीही पेटंट घेतलेला नाही, असे ते म्हणाले. 

हेही वाचा
सर्व पहा