जोयडा : गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, रामनगर परिसरातील दोन मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. रामनगरच्या नागनाथ गल्ली येथील सातेरी मंदिर आणि विरकोळ येथील नागनाथ मंदिरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी घरफोडी केली. या दोन्ही मंदिरांच्या प्रवेशद्वारांची कुलूपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि फंडपेट्यांमधील हजारो रुपयांची रोकड पळवून नेली.
सातेरी मंदिरातील फंडपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे १५ हजार रुपयांहून अधिक रक्कम पळवली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नागनाथ मंदिराकडे वळवला. तेथील फंडपेटीतील १५ हजार रुपयांची रोकड आणि देवाला अर्पण केलेल्या नागाच्या तीन लहान चांदीच्या मूर्ती असा ऐवज चोरून नेला. गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी आणि वर्दळ असताना एकाच रात्री दोन मंदिरांत झालेल्या या चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने दोन्ही मंदिरांना भेटी देऊन पाहणी केली. पोलिसांनी चोरीचा पंचनामा करून कायदेशीर तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या चोरीमागे आंतरराज्यीय टोळीचा हात आहे की स्थानिक चोरट्यांचे कृत्य आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील हालचाली आणि पुराव्यांचे विश्लेषण करत आहेत. सण-उत्सवाच्या काळात झालेल्या या घटनेमुळे मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


