पणजी : मागील काही वर्षांत वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांचा कामावर असताना अपघात होऊन मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांच्या कालावधीत खात्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वीज उपकरणांची देखभाल, खांब उभारणे आणि इतर कामांदरम्यान एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खात्याच्या ५ नियमित कर्मचाऱ्यांचा आणि खाजगी कंत्राटदारांच्या ४ कामगारांचा समावेश आहे.
वरील काळात आपले कर्तव्य बजावताना खात्याच्या पाच कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला. खात्यातर्फे मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. ऑगस्ट २२३ मध्ये ‘लाईन हेल्पर’ लाडू नाईक आरोंदेकर यांचा पर्वरी येथे काम करताना मृत्यू झाला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘लाईन हेल्पर’ शिवोली येथे काम करत असताना कृष्णा पवार यांचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये ‘लाईनमन’ मनोज वामन जांबावलीकर (डिचोली) यांचा मृत्यू झाला होता. इन्व्हर्टर मधील वीज गळती झाल्याने जांबावलीकर यांना वीजेचा धक्का बसला होता.
याशिवाय साहाय्यक ‘लाईनमन’ चंद्रो वासू गावकर, ‘लाईन हेल्पर’ मंथन आरोसकर यांचा देखील काम करत असताना मृत्यू झाला होता. उच्च दाब वाहिन्यांतून विजेचा धक्का लागणे, ग्राहकांच्या ‘इनव्हर्टर’ अथवा जनरेटरमधून करंट लीक होणे, झाडांची छाटणी करताना जिवंत विजेच्या तारेच्या जवळ जाणे ही या अपघातांची मुख्य कारणे होती.
वरील काळात खाजगी कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या ४ कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. गौरव कुमार (कुडचडे/कुडतरी), बलराम सरकार (दवर्ली), मनोज कुमार महतो (सांगे) आणि पंकज यादव (वेर्णा) या कामगारांचा खांब उभारताना, खांबाला रंग देताना आणि विजेचा प्रवाह लीक झाल्यामुळे मृत्यू झाला होता.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई
अपघाती मृत्यूबाबत खात्यातर्फे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यानुसार एका कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले. साहाय्यक अभियंत्याला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली. आणि काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. खाजगी कंत्राटी कामगारांच्या बाबतीत 'कर्मचारी भरपाई कायद्यानुसार' संबंधित कंत्राटदारांनीच मृत कामगारांच्या कुटुंबाला भरपाई देणे बंधनकारक आहे. वरील कालावधीत कायमस्वरूपी अपंगत्वाची एकही नोंद झालेली नाही.


