पणजी :पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकी चालवण्यास बंदी असतानाही काही जण बॅरिकेड्स हटवून नियम मोडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या उड्डाणपुलावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यासह दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
सीसीटीव्हीच्या नजरेत उड्डाणपूल
पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना बंदी घालणारी अधिसूचना सरकारने जारी केली आहे. अटल सेतूवरही दुचाकींना बंदी असल्याने तेथून दुचाकी जाण्याचा प्रश्नच येत नाही. आता पर्वरी उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून, दुचाकी गेल्यास तिचा क्रमांक कॅमेऱ्यात नोंदवला जातो.
प्रवेशबंदी असलेल्या रस्त्यावर वाहन नेल्यास दंड आकारला जातो. त्यानुसार आता उड्डाणपुलावरून दुचाकी चालवल्यास अडीच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे पर्वरी वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नायक यांनी सांगितले.
एंट्री पॉईंटवर पोलिसांची विशेष व्यवस्था
वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी उड्डाणपुलाच्या एंट्री पॉईंटवर आता पोलिसांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे बॅरिकेड्स हटवून उड्डाणपुलावर दुचाकी नेणे वाहनचालकांना शक्य होणार नाही, असे नायक यांनी स्पष्ट केले.
सरकारने पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना प्रवेशबंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहनांवर नजर ठेवण्यात येत असून, नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी भीषण अपघात
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ९ सप्टेंबरला पर्वरी उड्डाणपुलाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर चतुर्थीच्या आदल्या दिवशी, ११ सप्टेंबरला सायंकाळी या उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू करण्यात आली.
मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १२ सप्टेंबरला येथे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर दुचाकींवर बंदी
या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून दुचाकींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित अधिसूचनाही जारी केली.
तरीही चतुर्थीच्या दिवशी बॅरिकेड्स हटवून दुचाकी चालवण्याचे प्रकार घडले. त्यामुळे आता पोलिसांची तैनाती करण्यासोबतच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.


