पणजी :शालान्त मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी गणित विषयात लेव्हल १ आणि लेव्हल २ असे दोन पेपर घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असलेल्या कठीण लेव्हल १ ऐवजी लेव्हल २ घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात लेव्हल १ गणित घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक कमी होत असल्याची माहिती विधानसभेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समोर आली आहे.
ग्रामीण तालुक्यांत घट अधिक
काणकोण, धारबांदोडा, पेडणे, केपे, सांगे, सत्तरी आणि डिचोली हे तालुके ग्रामीण भागात येतात. या सर्व तालुक्यांमध्ये लेव्हल १ गणित निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेणार नसलेल्या विद्यार्थ्यांना लेव्हल २ घेण्याची मुभा असल्यामुळे, बहुतांश विद्यार्थी या पर्यायाची निवड करत आहेत.
याचाच परिणाम म्हणून लेव्हल १ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यांत ही घट विशेष मोठी आहे.
| तालुका | २०२४ | २०२५ | २०२६ |
|---|---|---|---|
| काणकोण | २०५ | १६० | ९८ |
| धारबांदोडा | ९४ | ४७ | १५ |
| पेडणे | २६६ | २४८ | १९९ |
| केपे | ४२० | २९६ | २१७ |
| सांगे | ९२ | ६६ | ३८ |
| सत्तरी | ३४१ | २५७ | १७५ |
| डिचोली | ६०८ | ४४८ | ३४३ |
शहरी भागातही संख्या घटली
तिसवाडी, बार्देश, मुरगाव, सासष्टी आणि फोंडा या तालुक्यांमध्ये शहरी भागाचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण तालुक्यांच्या तुलनेत या शहरी भागांत लेव्हल १ गणित घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक असली, तरी येथेही वर्षागणिक ही संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
विशेष म्हणजे लेव्हल १ आणि लेव्हल २ या दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम तसेच शिक्षक एकच आहेत.
| तालुका | २०२४ | २०२५ | २०२६ |
|---|---|---|---|
| बार्देश | १,२९५ | १,०२६ | ८४६ |
| मुरगाव | ५५९ | ४८२ | ३७२ |
| फोंडा | १,१६८ | ९०४ | ६९७ |
| सासष्टी | १,६३० | १,१९६ | १,०२७ |
| तिसवाडी | ९३४ | ७८४ | ६१६ |
कमी गुण मिळाल्यास लेव्हल २चा पर्याय
दहावीच्या परीक्षेत लेव्हल १ घेऊन गणितात कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा देणारा पर्याय उपलब्ध आहे. अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला लेव्हल २ घेऊन पुन्हा परीक्षा देण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी शालान्त मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी लेव्हल १ महत्त्वाचे
विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी लेव्हल १ गणित अनिवार्य असल्याने या विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने त्याचा परिणाम भविष्यातील शैक्षणिक पर्यायांवर होऊ शकतो. दुसरीकडे विज्ञान शाखेत प्रवेश घेणार नसलेल्या विद्यार्थ्यांना लेव्हल २ निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे.


