मडगाव : सुरावली येथील रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वेची जोरदार धडक बसल्याने एका २० ते २५ वयोगटातील अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
ही दुर्घटना सोमवारी (१४ सप्टेंबर) घडली. घटनेची माहिती मिळताच मडगाव रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांनी तात्काळ कोकण रेल्वे पोलिसांना खबर दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण रेल्वे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.
सध्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील शवागारात पाठवण्यात आला आहे. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून, उपनिरीक्षक जितेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


