धारवाड: जमिनीच्या दस्तऐवजांतील दुरुस्ती आणि उपविभागाच्या कामासाठी (पोडी) तब्बल ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना धारवाडचे तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर यांना लोकायुक्त पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. बुधवारी रात्री उशिरा कर्नाटक महाविद्यालय (केसीडी) परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धारवाड तालुक्यातील येरिकोप्पा येथील सुमारे ३३ एकर जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करण्यासाठी आणि उपविभागासाठी ही लाच मागण्यात आली होती. एका विकासकाने खरेदी केलेल्या या जमिनीतील शेतीयोग्य व पडीक भागाच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार कुचनूर यांनी १ कोटी रुपये रोख आणि १ एकर जमिनीची मागणी केली होती. ही रक्कम ५० लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले होते.
लाचेच्या या अवाजवी मागणीविरोधात विकासकाने लोकायुक्त पोलिसांत तक्रार दाखल केली. लोकायुक्त अधीक्षक सिद्धलिंगप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने सापळा रचला. ठरल्यानुसार तक्रारदाराकडून लाल रंगाच्या पिशवीतील ५० लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लोकायुक्तांनी तहसीलदाराला ताब्यात घेतले.
लोकायुक्तांनी लाचेची रक्कम जप्त केली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात असून आरोपीच्या घराची झाडाझडती व मालमत्तेची चौकशी सुरू आहे.
सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नुकतीच राजस्थानमधील भरतपूर येथे कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याच्या घरातून ४३.३८ लाख रुपये रोख आणि २० किलो चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या होत्या. या घटनांमुळे महसूल आणि प्रशासकीय विभागांतील वाढत्या भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


